धाराशिव प्रतिनिधी
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा आधार देऊन आरक्षण मंजूर झाल्यानंतर आता बंजारा समाजानेही समान मागणीचा आवाज बुलंद केला आहे. या मागणीला न्याय मिळावा, यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मुरूमजवळील नाईकनगरमध्ये पवन गोपीचंद चव्हाण (वय ३२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पवनच्या खिशातून पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत त्याने स्पष्ट शब्दांत लिहिले आहे की, “हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजालाही अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे.” यामुळे या तरुणाने आत्महत्येपूर्वी केलेल्या मागणीची ठाम नोंद झाली आहे.
चव्हाण हा मूळ लातूर जिल्ह्यातील शाहू कॉलेजचा वाणिज्य शाखेचा पदवीधर. सध्या तो बेरोजगार होता. मात्र समाजकारणात सक्रिय राहून बंजारा समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत होता. नुकतेच तो जालना जिल्ह्यातील जिंतूर येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. दोन दिवस आंदोलनात राहून परतल्यानंतर केवळ एका दिवसात त्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याने समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
पवनच्या आत्महत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. मृत्यूपत्राच्या आधारे ही घटना आरक्षणाच्या मागणीशी थेट जोडली गेल्याने बंजारा समाजात संतापाची लाट उसळली आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळाले, मग आम्हाला का नाही?” असा प्रश्न समाजाकडून विचारला जात आहे.
चव्हाण याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा परिवार असून या दुर्दैवी घटनेने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या टोकाच्या घटना रोखण्यासाठी सरकारने आरक्षणाच्या मागणीसंदर्भात तातडीने ठोस निर्णय घेणे अपरिहार्य आहे. अन्यथा बंजारा समाजातील आरक्षण चळवळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


