
सोलापूर प्रतिनिधी
शहरातील रस्त्यावर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोकाट जनावरांच्या त्रासाला आळा घालण्यासाठी अखेर सोलापूर महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या या जनावरांवर आता थेट कारवाई होणार असून, इअर टॅगिंग असलेल्या जनावरांच्या मालकांना जड दंड तर टॅग नसलेली जनावरे थेट गोशाळेत कायमस्वरूपी ठेवली जाणार आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी नियंत्रण अधिकारी तपन डंके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सहायक पोलीस निरीक्षक सतीश दावणे आदी उपस्थित होते.
डॉ. ओम्बासे यांनी स्पष्ट केले की, ११ जुलैपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असूनही शहरातील मोकाट जनावरांची संख्या आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे आता पोलिसांच्या मदतीने ठराविक भागात मोहीम राबवून जनावरे पकडली जाणार आहेत.
अशी होणार कारवाई
* शहरात रस्त्यावर दिसणारी जनावरे लगेच पकडून गोशाळेत हलवली जाणार.
* जनावरे मुद्दाम सोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई होणार.
* इअर टॅगिंग नसलेली जनावरे कायमस्वरूपी जप्त होणार; त्यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.
दंडाची नियमावली
* पहिल्यांदा आढळल्यास : मोठ्या जनावरांवर १० हजार, लहान जनावरांवर ५ हजार रुपये दंड.
* दुसऱ्यांदा आढळल्यास : मोठ्या जनावरांवर २० हजार, लहान जनावरांवर १० हजार रुपये दंड.
* तिसऱ्यांदा आढळल्यास : जनावरे कायमस्वरूपी गोशाळेत जमा.
जनावरे सोडवून घेण्याची प्रक्रिया
जप्त झालेली टॅगिंग असलेली जनावरे परत मिळवण्यासाठी मालकाने दंड भरल्याची पावती, तसेच १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवरील स्वयंघोषणापत्र (२ साक्षीदारांच्या सहीसह) सादर करणे बंधनकारक आहे. मात्र ही प्रक्रिया १० दिवसांच्या आत पूर्ण केल्यासच जनावरे परत मिळतील, असे नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी स्पष्ट केले.
शहरातील सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेची ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. मात्र जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांनी आता सावध राहण्याची गरज आहे, अन्यथा दंड व जप्ती या दुहेरी कारवाईस सामोरे जावे लागेल.