
सोलापूर प्रतिनिधी
तिकीटाशिवाय किंवा अवैध तिकिटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने मोठी कारवाई करत अवघ्या पाच महिन्यांत तब्बल १०० कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी १७.१९ लाख प्रवाशांना गाठले.
सोलापूर विभागात १.०४ लाख प्रवाशांना ताब्यात घेऊन ५.०१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. तर मुंबई विभागात सर्वाधिक ७.०३ लाख प्रवाशांवर कारवाई होऊन २९.१७ कोटी रुपये दंड आकारण्यात आला.
* विभागनिहाय दंड वसुली
* भुसावळ विभाग : ४.३४ लाख प्रकरणे – ३६.९३ कोटी
* मुंबई विभाग : ७.०३ लाख प्रकरणे – २९.१७ कोटी
* नागपूर विभाग : १.८५ लाख प्रकरणे – ११.४४ कोटी
* पुणे विभाग : १.८९ लाख प्रकरणे – १०.४१ कोटी
* सोलापूर विभाग : १.०४ लाख प्रकरणे – ५.०१ कोटी
* मुख्यालय : १.०४ लाख प्रकरणे – ७.५४ कोटी
ऑगस्ट महिन्यातच २.७६ लाख प्रवाशांवर कारवाई करून १३.७८ कोटी रुपये दंड आकारण्यात आला. ही रक्कम गेल्या वर्षीच्या (ऑगस्ट २०२४) तुलनेत तब्बल ५५ टक्के जास्त आहे.
“प्रवाशांनी योग्य व वैध तिकीट खरेदी करूनच प्रवास करावा. यामुळे केवळ दंडाची भीती टळणार नाही, तर सन्मानपूर्वक आणि आरामदायी प्रवासही साधता येईल. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे,” असे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी स्पष्ट केले.