
सोलापूर प्रतिनिधी
कर्नाटकातील देवरनिंबर्गी (ता. चडचण, जि. विजयपूर) येथे बुधवारी सकाळी ग्रामपंचायत सरपंच भिमनगौडा कल्लणगौडा बिरादार (४०) यांची गावठी पिस्तुलातून सलग गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना गावातील हेअर कटिंग सलूनमध्ये सकाळी ८.५० च्या सुमारास घडली.
संशयितांनी सरपंचांच्या डोळ्यांत चटणी पूड टाकून, शिवीगाळ करत त्यांच्या छाती व डोक्यावर तीन-चार गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना विजयपूरच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा त्यांच्या गावी अंत्यसंस्कार पार पडले.
या प्रकरणी वसीम बशीर मनियार, रजिउल्ला नबिशा मकानदार, मौलासाब लाडलेसाब बोरगी, फिरोज रमजान अवराद (रा. देवरनिंबर्गी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मृत सरपंचाच्या पत्नी राजश्री बिरादार यांनी फिर्याद दिली आहे.
जुन्या वैमनस्यातून खून
२०२३ मध्ये जाकिर बशीर मनियार याने ग्रामविकास अधिकाऱ्याशी केलेल्या वादातून त्याच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला होता. यामागे सरपंच भिमनगौडा असल्याचा संशय व्यक्त होत होता. त्यामुळे संशयितांनी सूडाच्या भावनेतून ही हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सरपंच पदाचा राजीनामा देऊन जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी भिमनगौडा करत होते. त्यामुळे या खुनामागे वैयक्तिक द्वेषाबरोबरच राजकीय कारणेही असल्याची चर्चा आहे.
दोन लहान मुले, पत्नी गर्भवती
भिमनगौडा यांच्या पश्चात आई, गर्भवती पत्नी, दोन वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
गुन्ह्याला राजकारणाची किनार?
“संशयितांनी अन्याय होत असल्याच्या भावनेतून खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, यात राजकारण व जाकिर याचाही हात आहे का, याचीही चौकशी सुरू आहे,” अशी माहिती विजयपूरचे पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली.
भिमनगौडा हे उमराणीच्या बहिरगोंड टोळीचे महादेव सावकार यांचे निकटचे मानले जात होते. मात्र, त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदवला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.