
पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावून खेड तालुक्यातील पाळू गावाचे नाव उज्ज्वल करणारी अश्विनी केदारी आता या जगात नाही. केवळ 24 व्या वर्षी नियतीने तिचे आयुष्यच संपवले. तिच्या निधनाने संपूर्ण खेड तालुका तसेच ग्रामीण भागात शोककळा पसरली आहे.
दुर्दैवी अपघात
28 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. अभ्यासासाठी लवकर उठलेली अश्विनी अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी हीटर लावून ठेवले होते. पाणी किती तापले आहे हे पाहण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली. त्याचवेळी हीटरचा शॉक बसला आणि उकळते पाणी अंगावर सांडल्याने ती गंभीर भाजली. तब्बल 80 टक्के भाजलेल्या अवस्थेत तिला तातडीने पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 11 दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर रविवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला.
स्वप्न झाले चकनाचूर
अश्विनीने 2023 च्या MPSC PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता. तिचा आत्मविश्वास आणि जिद्दीने तिला जिल्हाधिकारी (Collector) होण्याचे स्वप्न पल्लवित केले होते. या दिशेने तिने जोरदार तयारीही सुरू केली होती. एका शेतकरी कुटुंबातील मुलीने स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यश संपादन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठसा उमटवला होता. परंतु नियतीच्या कठोर घावाने तिची सर्व स्वप्ने धुळीस मिळाली.
सामाजिक पुढाकारही निष्फळ
अश्विनीच्या उपचारासाठी मोठ्या खर्चाची गरज होती. खेड तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. मदतीच्या अनेक हात पुढे आले. परंतु सर्व प्रयत्नांना अखेर अपयश आले.
महाराष्ट्रभर हळहळ
अश्विनीच्या निधनामुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेले असंख्य विद्यार्थी हळहळ व्यक्त करत आहेत. ग्रामीण भागातील एक होतकरू, जिद्दी आणि यशस्वी विद्यार्थिनी अशा दुर्दैवी पद्धतीने आपल्यातून निघून जाणे हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठे धक्कादायक आहे. “तिचे यश हे फक्त पाळू गावाचे नव्हे तर ग्रामीण भागातील मुलींसाठी दीपस्तंभ होते,” अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.
अश्विनीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न, तिच्या जिद्दीची कहाणी आणि अकाली झालेले निधन ही वेदनादायी घटना समाजाला हादरवून सोडणारी ठरली आहे.