
पुणे प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बढत्यांचा महाधमाका झाला आहे. महापालिकेतील तब्बल २२७ अधिकारी व कर्मचार्यांना एकाचवेळी वरिष्ठ पदावर पदोन्नती देत आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांनी मोठा निर्णय घेतला आहे. चार सहायक आयुक्त, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यासह विविध महत्त्वाच्या पदांचा यात समावेश आहे.
महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर मागील साडेतीन वर्षांपासून आयुक्तच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. नुकत्याच झालेल्या पदोन्नती समितीच्या बैठकीत सेवाजेष्ठता, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचा विचार करून या बढत्या देण्यात आल्या. त्यासंबंधीचा आदेश आयुक्त सिंह यांनी जाहीर केला आहे.
कोणाला मिळाली बढती?
शैक्षणिक पात्रता व सेवाजेष्ठतेनुसार अधिकारी-कर्मचार्यांना बढती देण्यात आली असून त्यात –
* मुख्य माहिती अधिकारी – १
* सहायक आयुक्त – ४
* कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – १
* प्रशासन अधिकारी – ६
* उपअभियंता (स्थापत्य) – ३०
* असिस्टंट मेट्रन – ३
* कार्यालय अधीक्षक – ८
* मुख्य लिपिक – ७२
* उपलेखापाल – २५
* लिपिक – ६२
* वीज तंत्री – ३
* कनिष्ठ अभियंता – ४
* आरोग्य निरीक्षक – १
* सिस्टर इनचार्ज – ३
* नाईक – ४
अशा एकूण २२७ अधिकारी-कर्मचार्यांचा समावेश आहे.
प्रशासकीय राजवटीत ‘जलदगती’ बढत्या
नगरसेवक असताना बढत्यांची प्रक्रिया अनेक पायऱ्यांमधून जावी लागत असे. विधी समिती आणि सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यासाठी वेळ लागत असे. अनेकदा सभा तहकूब होऊन प्रक्रिया लांबणीवर जात असे. पण प्रशासकीय राजवटीत हा विलंब टाळला जात असून थेट आयुक्तांच्या आदेशावर बढत्या दिल्या जात आहेत.
मागील साडेतीन वर्षांत आतापर्यंत सुमारे ५०० अधिकारी व कर्मचार्यांना पदोन्नती मिळाल्याचे अधिकृत आकडे सांगतात. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत कर्मचार्यांचे कारकिर्दीचे ‘गाडीचक्र’ वेगाने फिरत असल्याचे स्पष्ट होत आहे.