
उल्हासनगर प्रतिनिधी
ठाकरे बंधूंच्या राजकीय समीकरणांमुळे उल्हासनगर महापालिकेतही बदल घडू शकतात, अशी चर्चा रंगली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा डाव खेळला आहे. उल्हासनगर महापालिकेत भक्कम ताकद असलेल्या टीम ओमी कलानी गटाने शिंदेंच्या शिवसेनेला खुलेआम पाठिंबा जाहीर केला आहे.
शुक्रवारी शिवसेना-शिंदे गटाचे संसदीय गटनेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरला भेट दिली. यावेळी ओमी कलानी आणि त्यांच्या नगरसेवकांनी शिवसेनेसोबत ‘दोस्तीचं गठबंधन’ करण्याचा निर्णय जाहीर केला. कलानी यांनी तब्बल १५ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचे स्पष्ट करत, आगामी महापालिका निवडणुका शिवसेनेसह एकत्रित लढण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदेंनी ओमी कलानी यांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला.
उल्हासनगरच्या राजकारणातील कलानी घराणं
उल्हासनगर महापालिकेत कलानी कुटुंबाचे वर्चस्व कायम राहिले आहे. सत्तेत असो वा विरोधात, प्रत्येक प्रभागात त्यांचा प्रभाव दिसून येतो. विधानसभेच्या वेळी पप्पू कलानी सक्रीय झाले होते, तर लोकसभेला कलानी कुटुंबाने डॉ. श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिला होता. उल्हासनगरचे विद्यमान आमदार मात्र भाजपचे कुमार आयलानी आहेत. अशा पार्श्वभूमीवर ओमी कलानी गटाची शिवसेनेला साथ मिळणं म्हणजे शिंदे गटाने ठाकरे बंधूंचा प्रभाव रोखण्यासाठी बांधलेली भक्कम तटबंदी मानली जात आहे.