
पुणे प्रतिनिधी
गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. नाना पेठ भागात शुक्रवारी (ता.५) गोळीबारात गोविंदा कोमकर (रा. नाना पेठ) याचा खून झाला. हा खून म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या वनराज आंदेकर हत्येच्या बदल्यात आंदेकर टोळीने रचलेला ‘गेम’ असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
वनराज आंदेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक राहिला होता. १ सप्टेंबर २०२४ रोजी डोके तालीम भागात त्याची निर्घृण हत्या झाली होती. त्यात प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या साथीदारांना अटक करून मोक्कांतर्गत कारवाई झाली. मात्र आंदेकर टोळीने वर्षभर वाट पाहून या हत्येचा बदला घेतल्याची चर्चा आहे.
हत्या झालेला गोविंदा कोमकर हा वनराज आंदेकरचा सख्खा भाचा असून संजीवनी कोमकरचा पुतण्या व गणेश कोमकरचा मुलगा आहे. हल्लेखोरांनी नाना पेठेतीलच वनराज आंदेकरच्या हत्येच्या ठिकाणाजवळ गोविंदावर तीन गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने पुणे पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान उभे राहिले आहे.
गेल्या काही वर्षांत बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळ्यांमध्ये रगेल संघर्ष सुरू आहे. २०२३ मध्ये आंदेकर टोळीने शुभम दहिभाते व निखील आखाडेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर गायकवाड टोळीनं वनराज आंदेकरचा खून केला. आता आंदेकर टोळीने गोविंदा कोमकरची हत्या करून त्या हत्येचा बदला घेतल्याची गुन्हेगारी वर्तुळातील चर्चा आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहरात कडक पोलीस बंदोबस्त असूनही टोळीयुद्ध उफाळल्यामुळे पोलिसांच्या गस्त आणि गुप्तचर यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.