
सोलापूर प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डि.जे. सिस्टीम व लेझर लाईटच्या वापरावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बंदीचे आदेश जारी केले आहेत. तहसीलदार मदन जाधव यांनी ही माहिती दिली. त्यामुळे यंदा मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पडणार आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील तब्बल १७० हून अधिक मंडळांनी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यातील गणेश मंडळे व पोलीस पाटलांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये बैठकींचे आयोजन करण्यात आले.
गेल्या काही वर्षांत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला होता. मात्र, त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याची प्रकरणे समोर आली. डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे काहींना कान व छातीचे विकार होऊन कायमचे अपंगत्व किंवा जीवितास धोका निर्माण झाला होता. तर लेझर लाईटमुळे लहान मुलांच्या व ज्येष्ठांच्या डोळ्यांना इजा झाल्याच्या घटना नोंदल्या गेल्या.
याबाबत ज्येष्ठ नागरिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) अन्वये, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मिरवणुकांमध्ये डॉल्बी व लेझर लाईटच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे.
त्यामुळे यंदा मिरवणुकांमध्ये पुन्हा एकदा पारंपरिक ढोल-ताशा, हलगी, लेझीम, कसरती यांचा जल्लोष पाहायला मिळणार असून स्थानिक कलाकारांना याचा लाभ होणार आहे.