
नवी दिल्ली वृत्तसंस्था
पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार कार्डात बायोमेट्रिक तपशील नोंदविणे अत्यावश्यक असल्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने स्पष्ट केले आहे. या संदर्भात UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील शालेय शिक्षण विभागांना शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देत पत्रव्यवहार केला आहे.
माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळांच्या माध्यमातून अशा शिबिरांचे आयोजन केल्यास लाखो विद्यार्थ्यांना सोयीस्कर रीतीने आधार अपडेट करण्याची संधी मिळेल. देशभरात अद्याप सुमारे १७ कोटी मुलांचे आधार बायोमेट्रिक तपशील नोंदवले गेलेले नाहीत, ही बाब गंभीर मानली जात आहे.
सरकारी योजनांसाठी व स्पर्धा परीक्षांसाठी गरजेचे
UIDAIच्या मते, जर बायोमेट्रिक अपडेट वेळेत झाले नाही, तर संबंधित विद्यार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यात तसेच एनईईटी (NEET), जेईई (JEE), सीयूईटी (CUET) यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांसाठी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा पालक व विद्यार्थी शेवटच्या क्षणी अपडेट करण्यासाठी धावाधाव करतात आणि प्रक्रियेत विलंब होतो.
शाळांना महत्त्वाची जबाबदारी
शाळांकडे विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध असल्याने बायोमेट्रिक अपडेटची प्रक्रिया शालेय पातळीवरच पार पाडण्याचे सुचवले आहे. यामुळे वेळेत व सुरळीतपणे विद्यार्थ्यांचे आधार तपशील पूर्ण करता येतील. UIDAIच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गेल्या वर्षी पाच वर्षांवरील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, अजूनही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे आधार अपूर्ण आहेत.
पुढील पाऊल महत्त्वाचे
या शिबिरांचे स्वरूप, कालावधी व आयोजन पद्धतीबाबत लवकरच निर्णय होणार असून, यामुळे प्रचंड संख्येने विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळेल. “आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे प्रमुख ओळखपत्र असून त्यातील सर्व तपशील अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे,” असे UIDAIचे प्रमुख भुवनेश कुमार यांनी स्पष्ट केले.