
मुंबई प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी अधिकारी-कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिन्याचा पगार १ सप्टेंबरला न देता पाच दिवस आधी म्हणजेच २६ ऑगस्ट रोजीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या खर्चासाठी आर्थिक तुटवड्याचा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहणार नाही.
या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी व अकृषी विद्यापीठे तसेच त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील अधिकारी-कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही होणार आहे. पगार वेळेआधी मिळाल्याने उत्सवकाळात सरकारी नोकरदारांचा आनंद द्विगुणित होणार आहे.
गणेशोत्सव काळात घराघरांत बाप्पांच्या आगमनासाठी सजावट, गोडधोड पदार्थांची तयारी, सांस्कृतिक कार्यक्रम अशा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या खिशाला दिलासा मिळावा, यासाठी शासनाने वेतन आगाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.
✦ गणेशोत्सवात पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
गणेशोत्सवातील शेवटच्या पाच दिवसांत गणेश मंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत देखावे सादर करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. कराड येथे झालेल्या कार्यक्रमात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली. याबाबतचा आदेश लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
✦ कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान मुंबई-बेंगळुरू व मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोलमाफी जाहीर केली आहे.
या वाहनांना व एसटी बसेसना ‘गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन’ या विशेष टोल पासवर प्रवास करता येणार असून त्यावर वाहन क्रमांक व मालकाची माहिती नोंदवली जाणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा वेळेआधी पगार, गणेश मंडळांना मध्यरात्रीपर्यंतची मुभा आणि कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी, या निर्णयांमुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक रंगतदार आणि उत्साहपूर्ण होणार हे निश्चित आहे.