
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि रिपब्लिकन सेना युतीने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल गुरुवारी रणनीती ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकांचे स्वरूप, प्रचाराचे आराखडे आणि जागावाटपाचा प्राथमिक आराखडा यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या बैठकीत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकांसाठी एकत्रितपणे काम करण्याचे ठरवले असून, स्थानिक पातळीवर युतीची ताकद वाढवण्यावर भर देण्यात आल्याचे समजते.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बौद्धानकर, महाराष्ट्र सचिव विनोद काळे, महाराष्ट्र नेते सुशील सूर्यवंशी, मुंबई विद्यार्थी सेना अध्यक्ष आशिष गाडे तसेच शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते.
या बैठकीनंतर शिवसेना,रिपब्लिकन सेना युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू झाल्याचे दिसून आले.