मुंबई प्रतिनिधी
मुंबई | बीकेसीतील मेट्रो लाईन-४ प्रकल्प परिसरातील ए.जी. इन्फ्रा लेबर कॉलनीत बुधवारी मध्यरात्री मजुरांच्या उशीखालून थेट ‘आजगराचे पिल्लू’ बाहेर पडल्याने खळबळ उडाली. झोपेत असलेल्या मजुरांना अचानक हा प्रकार लक्षात आल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
वापरा संस्थेचे सर्पमित्र अतूल कांबळे व पोलीस सर्पमित्र सचिन मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापाला सुरक्षितरीत्या पकडले. प्राथमिक निरीक्षणात तो आजगर जातीचा पिल्लू असल्याचे समोर आले. हा साप बिनविषारी असला तरी त्याचा आकार आणि अचानक हजेरीमुळे लेबर कॉलनीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वनपरिक्षेत्र अधिकारी रोशन शिंदे यांना घटनेची माहिती देण्यात आली असून, पकडलेला साप वनविभागाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सापांचे बिळे पाण्याखाली गेल्याने ते बाहेर पडत आहेत. तसेच या कॅस्टींग यार्डालगत असलेली मीठी नदी धोक्याच्या पातळीवर आल्यानेही हा साप नदीकाठावरून कॉलनीत आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याच भागात यापूर्वी आठ फूट लांबीची मगरही दिसल्याची नोंद आहे.


