
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील खासगी रुग्णालयांच्या मनमानीवर अखेर गंडांतर आले आहे. महाराष्ट्र नर्सिंग कायद्यानुसार बंधनकारक असलेले नियम पाळण्यात पाच हजार १३४ रुग्णालयांनी उघड उघड दुर्लक्ष केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले असून, आरोग्य विभागाने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या रुग्णालयांनी पुढील ३० दिवसांत त्रुटींची पूर्तता केली नाही, तर त्यांचा परवाना थेट निलंबित होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
तपासणीचे निष्कर्ष
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आदेश दिल्यानंतर राज्यातील २६ हजार ३५४ नोंदणीकृत रुग्णालयांची पाहणी करण्यात आली. त्यातून पाच हजारांहून अधिक रुग्णालयांनी रुग्णांना पारदर्शक सेवा न देता नियमबाह्य पद्धतीने कामकाज सुरू ठेवल्याचे धक्कादायक चित्र उघड झाले.
कायद्यानुसार प्रत्येक रुग्णालयाने दर्शनी भागात दरपत्रक, आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक व आवश्यक माहिती लावणे बंधनकारक आहे. मात्र मोठ्या संख्येने रुग्णालयांनी ही अट पाळली नाही.
रुग्णालयांवर नोंदवलेल्या तक्रारी
मनमानी पद्धतीने उपचारांचा खर्च आकारणे
रुग्ण व नातेवाईकांना उपचाराचा खर्च व तपशील न सांगणे
मान्यता नसलेले उपचार, प्राथमिक सुविधांचा अभाव
सुरक्षा व्यवस्थेची अपुरी सोय
मंडळनिहाय नोटीस मिळालेल्या रुग्णालयांची संख्या
मुंबई–ठाणे : २१५
पुणे : १६५०
नाशिक : ५८४
छत्रपती संभाजीनगर : ९०१
कोल्हापूर : ४२५
लातूर : ५८९
अकोला : ४०९
नागपूर : ३६१
पुढील कारवाई
आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, नोटीस मिळालेल्या रुग्णालयांना फक्त ३० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास संबंधित रुग्णालयांचे परवाने रद्द करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णालये चालवणाऱ्या खासगी व्यवस्थापनांपुढे ही कारवाई म्हणजे धोक्याची घंटा मानली जात आहे. रुग्णांना दरवेळी आर्थिकदृष्ट्या लुटणाऱ्या व नियम पायदळी तुडवणाऱ्या रुग्णालयांवर सरकारचा हा “कडक नजराणा” ठरणार आहे.