
उमेश गायगवळे. मुंबई
मुंबईत गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा शहराचा थरार उघड केला. राज्यभर पावसाची सक्रियता वाढली आहे. विदर्भ-मराठवाड्यात तब्बल १२ ते १४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हे केवळ आकडे नाहीत, तर शेतकऱ्यांच्या आयुष्याला तडे देणारे वास्तव आहे.
दशकभरापूर्वीही मुंबईसह महाराष्ट्राने पावसाने रडून पाहिले होते. पण प्रत्येक संकटानंतर शिकण्याऐवजी विसरणे आणि पुढच्या आपत्तीला निमंत्रण देणे, ही आपली जुनी सवय आहे.
मुंबईला बुडवायला आता केवळ ३०० मिमी पुरेसा आहे. एवढी ही ‘प्रगती’!
विमानतळाचा धिंगाणा
आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मुंबई विमानतळ मंगळवारी अक्षरशः पाण्याखाली गेला. डझनभर विमानं हवेतच घिरट्या घालत होती. हवामान खराब होते म्हणून विमानं उतरली नाहीत की रणवेवर पाणी साचल्यामुळे? हा प्रश्न प्रशासन टाळते, पण सत्य मुंबईकरांच्या डोळ्यासमोर आहे. देशाची आर्थिक राजधानी ज्या ३०० मिमी पावसाने कोलमडते, त्याच पावसाने दिल्लीसारख्या राजधानीलाही गुडघ्यावर आणले आहे. मग हा विकास नक्की कुठे चालला आहे?
26 जुलैचा धडा विसरलो!
२६ जुलै २००५ रोजी मुंबईत ९४४ मिमी पाऊस पडला होता. तो दिवस मुंबईकरांना कधीही विसरता येणार नाही. हजारो लोकांचे जीव, लाखो लोकांचे संसार या पावसाने वाहून नेले होते. पण २० वर्षांनंतर, फक्त ३०० मिमी पावसानेही मुंबईची दैना उडते आहे. एवढ्या वर्षांत आपण काय साधले? टोलेजंग टॉवर्स, उंच मॉल्स, बिल्डरांच्या तिजोऱ्या – पण पाण्याचा निचरा करणारी नाळ अजूनही गटारासारखी अडकलेली!
मुंबईची नाळ गळून पडली
• मध्य रेल्वे आणि हार्बर लाईन पूर्ण ठप्प. लोक तासन्तास गाड्यांमध्ये अडकून पडले.
• पश्चिम रेल्वेवर ५० टक्के गाड्या रद्द.
• आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्या पाण्याखाली. डझनभर विमानं हवेत फेरी मारत होती.
• मुंबईतील ७० पेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचले. अंधेरी सबवे, किंग्ज सर्कल, सायन, दादर, परळ, चेंबूर, कुर्ला, भांडुप, मुलुंड, कांदिवली, मालाड बोरिवली आदी ठिकाणी गाड्या बुडाल्या.
शहरं आणि खेडी, दोन्हीकडे समान दैना
आज केवळ मुंबईच नाही. पुणे, ठाणे, नवी मुंबई, – सर्व महानगरे पावसाने गुदमरतात. निचऱ्याची व्यवस्था नाही, रस्त्यांवर तळी, गल्लींमध्ये नाले. एवढंच काय, विकासापासून वंचित असलेली खेडीदेखील आज पाण्यात बुडत आहेत. विकास झालेलं शहर आणि विकासशून्य गाव, दोन्ही पावसात गटांगळ्या खात आहेत.
शेतकऱ्यांचा हंबरडा
संततधारेमुळे महाराष्ट्रातील तब्बल १४ लाख एकर पिके वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांचा हंगाम पाण्यात गेला. शहरात हा पाऊस गैरसोय आहे, पण शेतकऱ्यासाठी तो जीवघेणा संहार आहे. हवामान बदलामुळे पारंपरिक पिकपद्धती उद्ध्वस्त होत आहेत. ऋतूंची बिघडलेली लय, वाढते तापमान, याने शेतकरी अक्षरशः गुदमरत आहे. पण शासनाची दिशा अजूनही बिल्डरकेंद्रीच आहे; शेतकऱ्यांच्या भविष्याकडे कुणाचे लक्ष नाही.
विकास की विध्वंस?
सरकारला विकास म्हणजे काय? बिल्डरांची कंत्राटं, मॉल्स, सीमेंटच्या जंगलांची उभारणी, बुलेट ट्रेनची भ्रामक स्वप्नं.
मुंबईसारख्या किनारी शहरात खाडी, मिठागर, टेकड्या या नैसर्गिक कवचांवरही इमारती उभ्या राहतात. ठाण्यात नदीपात्रात बांधकामं, पुण्यात डोंगरफोडी, नवी मुंबईत पाणथळ जागांची लूट, हा सगळा ‘विकास’ म्हणजे आत्मघात!
प्रशासकीय अक्षम्यता
मे महिन्यातही ३००-४०० मिमी पावसाने मुंबईची नाळ बंद पडली होती. त्यातून काही धडा घेतला का? नाही! कारण प्रशासनाचा चेहरा वेगळा नाही, तोच कंत्राटदारांचा मुखवटा. उद्याने, मोकळी मैदाने, नाले-गटारांची सफाई, पाणथळ जागांचे संवर्धन, हे मुद्दे त्यांच्या अजेंड्यावरच नाहीत.
खरी गरज, नवी दिशा
आज आपल्याला हवी आहे विकासाची नवी व्याख्या. पाणी साठवणाऱ्या जागांचे संरक्षण, हरितक्षेत्रांचे संवर्धन, शाश्वत शेतकी पद्धती, हवामान बदलाला साजेसे नवे पीकवाण. पण आपण करतो काय? नदीवर पूल, नदीत इमारती, खाडीत टॉवर्स. ज्यांनी आपल्याला जिवंत ठेवलं, त्यांच्याच गळ्याला हात घालून आपण विकासाच्या नावाखाली आत्महत्येचा घाट घालतो आहोत.
३०० मिमी पावसाने मुंबईकरांच्या नाकातोंडात पाणी गेले आहे.
२० वर्षांपूर्वी ९४४ मिमी पावसाने बुडालेल्या मुंबईने जर काही शिकलं असतं, तर आज ही दैना झाली नसती.
मग खरा प्रश्न असा, आपण विकास करतो आहोत, की विध्वंस?
मुंबईचा गळा घोटणाऱ्या या विकासाच्या चिखलात आपण सगळेच फसलो आहोत.
आपण विकास करतो आहोत, की स्वतःच्याच गळ्याला फास लावतो आहोत?
मुंबई, पुणे, नवी मुंबई, दिल्ली, चेन्नई कुठेही पाहा.
विकासाच्या नावाखाली उभ्या केलेल्या काँक्रीटच्या जंगलांनी आपली शहरे पाण्यात बुडवली आहेत.
म्हणूनच मुंबईकरांच्या नाका तोंडात पाणी गेले…
आज पाणी साचले, उद्या जीव जातील.
आणि आपण मात्र अजूनही राजकीय घोषणांच्या बुडबुड्यांमध्ये भुलून राहिलो आहोत…