
उमेश गायगवळे, मुंबई
मुंबई – आगामी महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू होणार आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्यातील ३२ जिल्हा परिषदा, २९ महापालिका, ३३१ पंचायत समित्या व २८९ नगरपालिका व नगरपरिषदा निवडणुकांसाठी सज्ज होतील. राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिकांसह महापालिका निवडणुकांचे पहिले टप्पे घेण्याचे नियोजन केले असून, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा, महापालिका व पंचायत समित्यांची निवडणूक होईल.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर मार्च २०२२ पासून प्रशासकांची नियुक्ती आहे. आता आरक्षणासह गट, गण, वॉर्ड आणि प्रभागांची रचना बदलून निवडणुका घेण्यात येणार आहेत. राज्यातील जवळपास नऊ कोटी ८० लाख मतदार या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदार याद्या, प्रभागरचना, आरक्षण व मतदानाचे टप्पे यावर आधारित नियोजन केले गेले आहे. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार होईल, त्यानंतर आरक्षण जाहीर होईल. ज्यांची मतदार यादी लवकर पूर्ण होईल, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहेत.
सोन्याची कोंबडी: मुंबई महापालिका
संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महानगरपालिकेवर लागले आहे. किमान एका राज्याच्या बजेटसमान असलेल्या या महानगरपालिकेत कोणता पक्ष वर्चस्व राखेल, हे ठरवण्याचे उत्तर लवकरच समोर येणार आहे. राजकीय समीकरणे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनिश्चित आहेत; त्यामुळे येत्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरें आणि उद्धव ठाकरें यांनी एकत्र येऊन ‘ठाकरे बंधू’ यांची एकजूट दर्शवली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या या ऐतिहासिक मेळाव्यामुळे मुंबईतील मुस्लिम समाजाने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, राज ठाकरें यांच्या आधीच्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजात संमिश्र भावना आहेत; त्यामुळे उद्धव-राज यांची एकजूट असूनही राज ठाकरेंविषयी विरोध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे बंधूंची रणनीती आणि मुस्लिम मतदार
मुंबईतील मुस्लिम समाजाचे मतदान नेहमीच निर्णायक ठरते. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा प्रभाव स्पष्ट दिसून आला. भाजपने ‘व्होट जिहाद’च्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना घेरले होते; आता आगामी महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना लक्ष्य करू शकतात.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण आहे, परंतु राज ठाकरेंवर नाराजी असल्यामुळे काही मतदार अजूनही संकोचात आहेत. त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधूंना मुस्लिम समाजाची मते मिळवण्यासाठी सर्वसमावेशक भूमिका घेणे गरजेचे ठरणार आहे.
मुस्लिम मतदारसंख्या: मुंबईची निर्णायक शक्ती
मुंबईतील मुस्लिम समाजाचे मतदार संख्या आणि प्रभागांवरील प्रभाव मोठा आहे. दक्षिण मुंबईत ३ लाख २५ हजार, दक्षिण मध्य मुंबईत २ लाख ७४ हजार, उत्तर मुंबईत १ लाख ४४ हजार, उत्तर मध्यम ४ लाख १७ हजार, उत्तर पश्चिम ३ लाख ५९ हजार आणि ईशान्य मुंबईत २ लाख ४७ हजार मतदार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीत चांदवली, भायखळा, मुंबादेवी, अणुशक्तीनगर, वांद्रे, जोगेश्वरी, गोवंडी, भेंडी बाजारसह ५० प्रभागांमध्ये मुस्लिम समाजाचा प्रभाव आहे. तसेच १० विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचे मतदार २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहेत.
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिला होता, त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झाला. त्यामुळे महापालिका निवडणुकीत देखील मुस्लिम मतदारांचा प्रभाव निर्णायक ठरणार आहे.
राजकीय समीकरणे: ठाकरे बंधूंच्या हातात सत्ता
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या नाराज मुस्लिम मतदारांसह उद्धव ठाकरेंची लोकप्रियता यंदा समीकरणे वेगळी घडवू शकतात. मराठी मतांवर प्रभाव, मुस्लीम समाजाची भूमिका, तसेच भाजप आणि महाविकास आघाडीच्या पक्षांची रणनीती या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.
यंदा मुंबई महापालिका निवडणुकीची भूमिका बदललेली आहे; मुस्लिम समाजाच्या मतांवरच सत्ताधारी पक्षांची वाटचाल ठरवली जाणार आहे. आगामी निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारेल, हे पाहणे औचित्यपूर्ण ठरणार आहे.