
मुंबई प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहर पुन्हा एका वैष्णवीच्या कहाणीचा साक्षीदार ठरलं आहे. हुंड्याच्या जाचामुळे केवळ 26 वर्षांच्या उच्चशिक्षित दिव्या हर्षल सूर्यवंशी हिने आपलं जीवन संपवलं. वाकड येथील उच्चभ्रू सोसायटीत घडलेली ही घटना समाजाच्या विवेकाला चपराक मारणारी ठरली आहे.
नेमकं घडलं काय?
धुळे जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून आलेली दिव्या, उच्चशिक्षित असून तीन वर्षांपूर्वी तिचा विवाह आयटी अभियंता हर्षल सूर्यवंशीशी झाला होता. लग्नानंतर तिला सासरी जाच सहन करावा लागला. कधी सोन्याची अंगठी, तर कधी फ्लॅटसाठी फर्निचर— अशा सततच्या मागण्यांनी तिचं आयुष्य असह्य केलं. माहेरकडून मिळालेलं ४० तोळ्यांचं सोनं, साखरपुड्यात दिलेले पाच लाख आणि विवाहातील वीस लाख खर्च असूनही मागण्यांना अंत नव्हता, असा आरोप दिव्याच्या आईने केला.
“माझ्या मुलीला मारलं गेलं आहे. ती कधीच स्वतःहून असं टोकाचं पाऊल उचलली नसती. साखरपुडा, लग्न यात आम्ही आयुष्याची पुंजी खर्च केली, तरी मागण्या थांबल्या नाहीत,” अशी हाकाटी मृत विवाहितेच्या आईने केली.
कुटुंबीयांचे गंभीर आरोप
दिव्याच्या माहेरच्या मंडळींचा आरोप आहे की, हर्षल आणि त्याच्या कुटुंबीयांनी आधी दिव्याला मारहाण केली आणि नंतर तिला फाशीला लटकवलं. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. “लग्नानंतर सहा महिन्यांतच छळ सुरू झाला. सातत्याने पैशांसाठी त्रास, नोकरी न करण्यावरून टोमणे, आणि नंतर घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी माहेरहून पैसे आण, अशी परिस्थिती झाली होती,” असं दिव्याच्या भावाने सांगितलं.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी वाकड पोलीस स्टेशनमध्ये दिव्याचा पती हर्षल सूर्यवंशी तसेच सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिव्याचा मृत्यू हा अपघात नसून हुंड्याच्या छळाचा थेट परिणाम आहे, असं तिच्या कुटुंबीयांचं ठाम म्हणणं आहे.
समाजाला प्रश्न
उच्चशिक्षित, आधुनिक शहरात राहणारी तरुणी आजही हुंड्याच्या जाचाला बळी पडते, हे समाजाचं अपयश नाही का? शिक्षण, नोकरी, स्वतंत्र विचार असूनही ‘हुंडा’ या काळ्या सावलीतून सुटका का होत नाही? पुण्यासारख्या शहरात पुन्हा एक ‘वैष्णवी’ अशी नोंद करावी लागत असेल, तर प्रश्न फक्त एका घरापुरता मर्यादित नाही.
दिव्याच्या मृत्यूने केवळ एका आईचं कुश रिकामं झालं नाही, तर समाजासमोर पुन्हा एकदा कठोर आणि टोकदार प्रश्न उभा राहिला आहे.