
मुंबई प्रतिनिधी
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मदतीने यंदा कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यांत लक्षणीय वाढ करण्यात आली असून, यावर्षी मागील वर्षीपेक्षा तब्बल ३६७ अधिक फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
“रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विशेष पुढाकार घेत पत्राद्वारे ही योजना मंजूर केली आहे. यामुळे कोकणवासीयांच्या प्रवासाची मोठी सोय होणार असून, यासाठी त्यांचे आणि पंतप्रधानांचे मी आभार मानतो,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दरम्यान, कोकणवासीय गणेशभक्तांसाठी खास दोन मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून गेली १२ वर्षे चालणारी ही सेवा यंदा अधिक बळकट होणार आहे.
दोन स्पेशल गाड्यांचा तपशील
२३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दादर स्थानकावरून सुटणारी पहिली गाडी रत्नागिरी व कुडाळ येथे थांबणार असून अंतिम थांबा सावंतवाडी असेल.
२४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दादरहून सुटणारी दुसरी गाडी वैभववाडी व कणकवली येथे थांबून पुढे जाणार आहे.
दोन्ही गाड्यांसाठी प्रवाशांना मोफत जेवण व पाण्याची सोय केली जाणार असून, तिकिटांचे वाटप १८ ऑगस्टपासून मंडळ अध्यक्षांच्या माध्यमातून सुरू होणार आहे.
“कोकणवासीय गणेशभक्तांसाठी ही दुहेरी सोय म्हणजे एकप्रकारे ‘डबल धमाका’ आहे. सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.