
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत मुसळधार पावसाने अक्षरशः जनजीवन विस्कळीत झाले असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आज मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी महत्त्वाचा निर्णय घेत सर्व शासकीय, निमशासकीय तसेच महापालिका कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. खासगी कार्यालयांनाही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान खात्याने मुंबई व उपनगरांसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत रस्ते आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली असून, लोकल सेवाही उशिरा धावत आहेत.
नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे, असे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे. मात्र अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू राहणार आहेत.
सोमवारीच हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट दिला होता. त्यानुसार पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरातील आकाश काळ्या ढगांनी व्यापले असून, दुपार असूनही वातावरण गडद झाल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.