
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत पुन्हा एकदा पावसाने दाणादाण उडवली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून घाटकोपर-कुर्ला अप मार्गावर गाड्या थांबल्या आहेत. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे गाड्या गेल्या अर्धा तासाहून अधिक काळ उभ्या असून प्रवाशांचे हाल झाले आहेत. काही प्रवासी थेट ट्रॅकवर उतरून पायी जात असल्याचेही चित्र दिसले.
डाऊन मार्गावरील गाड्या सुरू असल्या तरी पावसाचा जोर कायम राहिला, तर मध्य रेल्वेच्या सेवेला आणखी धक्का बसण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने मुंबई, रायगड, पुणे घाटमाथा, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील काही जिल्हे व विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, रस्त्यांवर पाणी साचल्याने बससेवा विस्कळीत झाली असून लोकलसेवेत खोळंबा निर्माण झाला आहे. मात्र मेट्रो मात्र सुरळीत धावत आहे. अंधेरी पश्चिम-दहिसर पश्चिम (मेट्रो २ए) आणि अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व (मेट्रो ७) या दोन्ही मार्गिकांवर गाड्या विनाविलंब सुरू आहेत. उन्नत मार्गिकेमुळे मुसळधार पावसाचाही त्यावर परिणाम झालेला नाही.