
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील मुसळधार पावसाने वाहतूक ठप्प झाली असून अनेक ठिकाणी कंबरेएवढं पाणी साचलं आहे. या पाण्यात सायन परिसरात एक स्कूल बस अडकली. डॉन बॉस्को स्कूलमधील लहान मुलं बसमध्ये अडकून पडल्याची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं.
महापालिकेने सकाळीच शाळांना सुटी जाहीर केली असली तरी, शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचताना मोठी अडचण निर्माण झाली. काही ठिकाणी शाळा बस रस्त्यातच बंद पडल्या. साचलेल्या पाण्यातून वाट काढत पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
पोलिसांनी मदतीसाठी मानवी साखळीही केली. अनेक विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन पोलीस स्टेशनमध्ये आसरा देण्यात आला. एवढंच नव्हे तर लहान मुलांना खाऊही देण्यात आला आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना मुलांबाबत माहिती देण्यात आली.
पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली असून पालकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका होऊन मोठा दिलासा मिळाला आहे.