
उमेश गायगवळे, मुंबई
१६ ऑगस्ट. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक नितळ व्यक्तिमत्त्व, जनतेचा लाडका नेता, “आबा” म्हणून घराघरात पोचलेलं नाव, रावसाहेब रामराव पाटील.आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना, महाराष्ट्र पुन्हा एकदा विचार करतोय, अशी स्वच्छ, प्रामाणिक आणि निडर नेतृत्वशैली पुन्हा या राज्याला लाभेल का?
आबांचा साधेपणा : पद मोठं की माणूस?
एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा… पायात रबरी चप्पल, हातात एखादी-दुसरी वही घेऊन कॉलेजात जाणारा तरुण…
हा मुलगा पुढे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होईल, हे कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
पण आबा तसलेच होते, पद त्यांच्यासाठी वैभव नव्हतं; पद हे लोकांसाठी काम करण्याचं साधन होतं.
आबांच्या साधेपणाची झलक त्यांच्या संपूर्ण आयुष्यात दिसली. मंत्री झाल्यावरही त्यांच्या अंगावर ना ब्रँडेड कपडे, ना गाड्यांचा ताफा, ना नोकरांचा गर्विष्ठपणा.
ते जिथे जायचे, तिथे शेतकरी, शिक्षक, वकील, पत्रकार, कोणताही साधा माणूस सहज त्यांच्यापर्यंत पोचायचा.
आजच्या “सत्ताधारी” नेत्यांनी आरसा बघावा, संपत्तीचा प्रपंच, दिमाखदार बंगले, परदेशी दौरे… हेच का राजकारणाचं मोजमाप?
आबांचा साधेपणा सांगतो, लोकांच्या मनातलं पद हेच खरं पद असतं.
डान्सबार विरोधी लढाई : पैशांच्या मोहाला झिडकारलेलं निडर नेतृत्व
२००३ मध्ये गृहमंत्री झाल्यावर आबांसमोर मोठं आव्हान होतं.महाराष्ट्रात डान्सबार संस्कृती वाढत होती. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या बारमुळे हजारो घरं उद्ध्वस्त होत होती.तेव्हा आबांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम स्मरणात राहील, डान्सबार बंदी.
पक्षांतर्गत दबाव, विरोधकांची टिका, कोर्टातले खटले, बारवाल्यांचा पैसा… या सर्वांचा आबांनी सामना केला.
त्यांना पैशाचं आमिष दाखवलं गेलं, कोट्यवधींची ऑफर ठेवली गेली.
पण आबांनी साफ सांगितलं
“पैशासाठी मी माझ्या महाराष्ट्राच्या मुलींचं आयुष्य विकू शकत नाही.” “तरुण पिढी बरबाद होतंना पाहू शकत नाही”
आज जेव्हा राजकारणात भ्रष्टाचार, पैशासाठी तडजोड, सौदेबाजी रोज उघडकीस येते, तेव्हा आबांची ही निडरता डोळ्यात पाणी आणते.
राजकारणी होणं सोपं आहे; पण आबांसारखा मंत्री होणं दुर्मिळ आहे.
सावकारगिरी विरोधी भूमिका : शेतकऱ्याचा खरा आबा
आबा फक्त शहरातल्या प्रश्नांवरच लढले नाहीत. ते मूळचे शेतकरी होते, आणि शेतकऱ्यांचा त्रास त्यांना हाडामासातून कळायचा.
त्या काळात महाराष्ट्रात खाजगी सावकारगिरीने उच्छाद मांडला होता. शेतकरी कर्जबाजारी, आत्महत्येच्या उंबरठ्यावर.
बँकेकडून कर्ज मिळेना, सावकार दररोज घरासमोर उभा…
तेव्हा आबांनी ठाम भूमिका घेतली. सावकारगिरी मोडीत काढली.
त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबं वाचली.
आज गावोगाव जेव्हा लोक “सावकार पळाले” असं म्हणतात, तेव्हा त्या मागे आबांचा ठाम निर्णय आहे.
सडेतोड, बिनधास्त, बेधडक नेता
आबांची एक खासियत म्हणजे ते डोक्यावर पिसं ठेवून, लाडिकपणे लोकांना खूष करणारे नेता नव्हते.
ते सडेतोड बोलायचे, बेधडक बोलायचे. पण त्यांच्या शब्दांत प्रामाणिकपणा आणि वास्तव असे.
म्हणूनच त्यांचं बोलणं लोकांना रुचायचं.
त्यांनी गृहमंत्री म्हणून घेतलेले अनेक निर्णय, गुटखा बंदी, नक्षलग्रस्त भागात विकासाची बीजं, हे त्यांच्या निडर वृत्तीचं उदाहरण आहे.
आबांनी दाखवून दिलं ,नेता हा तडजोड करणारा नसतो; नेता हा मार्ग दाखवणारा असतो.
पवारांचा हिरा, जनतेचा आबा
शरद पवारांनी आबांना “कोळशातला हिरा” म्हटलं होतं.
हा हिरा जिल्हा परिषदेपासून थेट उपमुख्यमंत्रीपदापर्यंत गेला.
पण त्या प्रवासात सत्ता, पैसा, पद, गर्व काहीच आबांना बदलू शकलं नाही.
आजच्या राजकीय नेत्यांनी इथं थांबून विचार करावा :
आबा गरीबीतून आले, पण स्वच्छ राहिले.
आपण श्रीमंतीतून आलो आहोत, तरी भ्रष्टाचार टाळू शकतो का?
आजचा प्रश्न : आबा पुन्हा जन्माला येतील का?
आज राजकारण म्हणजे पैशांची तिकिटं, निवडणुकीतल्या कोट्यवधींची उधळण, पद मिळालं की प्रॉपर्टी वाढवण्याची शर्यत.
या सगळ्यात जनता कुठं आहे? समाज कुठं आहे? शेतकरी कुठं आहे?
आबा नसल्याची पोकळी आज महाराष्ट्राला जाणवते.
ते पुन्हा येतील का?
कदाचित नाही. कारण अशा प्रामाणिक, निडर, बेधडक नेत्यांना निर्माण करायचं धैर्य समाजात उरलंय का, हा प्रश्न आहे.
शेवटचा सलाम
आज त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र फक्त आठवण काढत नाही; महाराष्ट्र स्वतःला आरसा दाखवतोय.
आर. आर. पाटील यांचं जीवन आपल्याला शिकवून जातं.
“सत्ता ही दिखाव्यासाठी नसते; सत्ता ही समाजासाठी असते.”
अशा या जनतेच्या खऱ्या आबाला, अजातशत्रू नेत्याला विनम्र अभिवादन…