
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांसाठी वाहतुकीत मोठा दिलासा देणारी आनंदवार्ता! सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या (SCLR) अंतिम टप्प्यातील देशातील सर्वाधिक तीव्र वळण असलेला ‘केबल स्टेड पूल’ येत्या 14 ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी खुला होत आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अनोख्या पुलाचे लोकार्पण होणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.
या पूलामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडीचा कायमचा शेवट होणार असून, वाकोला, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि एलबीएस मार्गावरील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुलाचे वैशिष्ट्ये
लांबी: 215 मीटर
उंची: जमिनीपासून 25 मीटर
विशेषता: देशातील सर्वाधिक तीव्र वळणाचा पूल
रचना: ऑर्थोपेडिक स्टील डेक, Y-आकाराचा पायलन
जोडणी: सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग, वाकोला पूल मार्गे
वाहतुकीला मिळणारा दिलासा
या पूलामुळे पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान सिग्नलविरहित आणि अखंड वाहतूक शक्य होणार आहे.
कुर्ला ते विमानतळ प्रवास वेळेत लक्षणीय बचत
वाकोला, बीकेसी, एलबीएस मार्गावरील गर्दी कमी
हंस भुग्रा मार्ग–WEH सिग्नल आणि वाकोला जंक्शनवरील अडथळ्यांना पूर्णविराम
पर्यावरणीय लाभ
सिग्नलविरहित वाहतूक आणि कमी प्रवास वेळेमुळे इंधन बचत होऊन कार्बन उत्सर्जनात घट होणार आहे. तसेच, पुलाच्या Y-आकाराच्या पायलनमुळे खालील पायाभूत सुविधांचेही संरक्षण होईल.
उशीराची कारणे
हा प्रकल्प 2016 मध्ये सुरू झाला होता. 2019 पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट होते, मात्र कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे विलंब झाला. तांत्रिकदृष्ट्या किचकट असलेल्या या पुलासाठी वारंवार मुदतवाढ घ्यावी लागली, तसेच कंत्राटदाराला दंडही ठोठावण्यात आला.
सध्या पूलाचे सर्व मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून, साइनेज, रंगकाम आणि तात्पुरत्या आधारांचे काढणे यांसारखी अंतिम कामे सुरू आहेत. 14 ऑगस्ट 2025 रोजी हा पूल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.