
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात पोलिस दलात तब्बल १५ हजार पदांची मेगाभरती होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास हिरवा कंदील मिळाला. राज्यभरातील कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पोलिसांवरील वाढता कामाचा ताण कमी करण्यासाठी ही ऐतिहासिक भरती केली जात आहे.
* कोणत्या पदांसाठी किती जागा?
* पोलीस शिपाई – १०,९०८
* पोलीस शिपाई चालक – २३४
* बॅण्डस् मॅन – २५
* सशस्त्री पोलीस शिपाई – २,३९३
* कारागृह शिपाई – ५५४
पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही गट-‘क’ संवर्गातील पदे जिल्हास्तरावर भरली जाणार असून, ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
ज्येष्ठ उमेदवारांसाठी दिलासा
या भरतीत सन २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही एक वेळच्या विशेष संधीद्वारे अर्ज करता येणार आहे.
भरतीची सूत्रे पोलिसांकडेच
अर्ज मागवण्यापासून ते शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि निवड प्रक्रियेपर्यंतची सर्व जबाबदारी प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सांभाळणार आहेत.
का गरजेची भरती?
रिक्त पदांमुळे पोलिसांवर ताण वाढला असून, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी तातडीने भरतीचे निर्देश दिले आहेत. विधिमंडळातील चर्चेत लोकप्रतिनिधींनीही पोलिस दलातील रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी केली होती.
राज्यातील युवा उमेदवारांसाठी ही भरती सुवर्णसंधी ठरणार असून, पुढील काही दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.