
गंगापार (उत्तरप्रदेश) वृत्तसंस्था
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडे राखी बांधण्यासाठी घराकडे निघालेला तरुण मालगाडीच्या भीषण धडकेत जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. २२ वर्षीय अमर सिंग पटेल या एकुलत्या एक भावाच्या मृत्यूनं बहिणीचा हात कायमचा रिकामा झाला असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मेजाखासच्या पटेल बस्तीतील रहिवासी अरविंद सिंग पटेल यांचा मोठा मुलगा अमर सिंग, इटावा जिल्ह्यातील वाहतूक विभागात कंत्राटावर वाहन दुरुस्तीचे काम करत होता. गुरुवारी रात्री तो ट्रेनने घरी जाण्यासाठी निघाला होता. शुक्रवारी सकाळी मेजा रोड स्टेशनवर उतरल्यावर डीएफसी लाईन ओलांडताना मालगाडीने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तो रूळांवरून दूर फेकला गेला आणि जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटताच कुटुंबियांनी रेल्वे स्टेशनवर धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
घटनेनंतर गावात शोककळा पसरली. बहिणीचा एकुलता भाऊ गमावल्याने ती अश्रूंनी ढसाढसा रडू लागली. दरम्यान, मेजा रोड रेल्वे स्टेशन परिसरात फुट ओव्हरब्रिजच्या अभावामुळे अशा अपघातांची मालिका सुरू असल्याची स्थानिकांची नाराजी उफाळून आली. या पुलासाठी वारंवार मागणी करूनही काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.