
मुंबई प्रतिनिधी
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर केलेल्या एका विधानामुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या अडचणीत भर पडली आहे. ‘हिंदू द्वेषी’ वक्तव्य केल्याचा आरोप करत सनातन संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी चव्हाण यांना तब्बल 10 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे. तसेच चव्हाण यांनी बिनशर्त लेखी माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विशेष एनआयए न्यायालयाने अलीकडेच 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. निकालावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्यांनी काँग्रेसवर ‘भगवा दहशतवाद’ ही संकल्पना जन्माला घालून हिंदूंना लक्ष्य केल्याचा आरोप केला. यावर चव्हाण यांनी ‘भगवा नव्हे, तर सनातनी दहशतवाद म्हणा’ असे वक्तव्य केले होते. या विधानावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. शिवसेनेने मुंबईत त्यांच्या विरोधात मोर्चाही काढला होता.
15 दिवसांत माफी न मागल्यास खटला
चव्हाण यांच्या विधानाला ‘हिंदू द्वेषी’ ठरवत पाठवलेल्या नोटिशीत 15 दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच माफी मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने प्रसिद्ध करावी, भविष्यात अशा प्रकारची बदनामी करणारी विधाने करू नयेत आणि कायदेशीर खर्च म्हणून 10 हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा फौजदारी व दिवाणी खटले दाखल करण्यात येतील, असा इशारा संस्थेचे मानद कायदेशीर सल्लागार व मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी वकील रामदास केसरकर यांनी दिला आहे.
“तेव्हा लक्षात आलं नाही का?”
सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले, “आज चव्हाण सांगत आहेत की ‘भगवा’ हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, छत्रपती शिवरायांचा, संतांचा आहे. पण मालेगाव प्रकरणानंतर काँग्रेस नेत्यांनी यथेच्छ ‘भगवा दहशतवाद’ म्हणत हिंदूंना लक्ष्य केले. तेव्हा चव्हाण यांना ‘भगवा’ छत्रपतींचा आहे, हे लक्षात आलं नाही का? इतकी वर्षे ते झोपले होते का?” असा सवालही त्यांनी केला.