
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : जन सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा आणि ‘संन्यस्त खड्ग’ नाटकावर बंदी घालावी, या मागण्यांसाठी भीम सैनिक संघटनेच्या वतीने आज (८ ऑगस्ट) सायंकाळी दादर स्टेशन (पूर्व) येथे मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण व्हावे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे, तसेच सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कलाकृतींवर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी केली.
प्रमुख मागण्या :
1. जन सुरक्षा कायदा रद्द करा : महाराष्ट्र विधानसभेत नुकताच मंजूर झालेला हा कायदा संविधानाच्या मूल्यांना धक्का पोहोचवतो, असा संघटनेचा आरोप आहे. या कायद्यामुळे नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होण्याची शक्यता असून, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा आणतो, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
2. ‘संन्यस्त खड्ग’ नाटकावर बंदी घाला : हे नाटक धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावणारे असून, समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यावर बंदी घालावी, अशी मागणी संघटनेने केली.
या मोर्चादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणा देत आपली भूमिका ठामपणे मांडली. या आंदोलनाची दखल प्रशासन घेणार का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.