
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : विवाहबाह्य संबंधांमुळे खूनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबईच्या गोरेगाव-पूर्व येथील आरे कॉलनीतील एकता नगर वस्तीत घडलेली ही घटना अंगावर शहारा आणणारी आहे. पत्नीच्या विश्वासघाताचा जाब विचारल्यामुळे एका ४० वर्षीय व्यक्तीचा जीव गेला असून, धक्कादायक म्हणजे या प्रकारात त्याच्या पत्नीचाच हात असल्याचे समोर आले आहे. पतीवर अत्याचार झाल्यानंतरही शांत राहिलेल्या महिलेचा कुटील हेतू तिच्या १३ वर्षीय मुलीने उघड केला आहे.
मेकअप आर्टिस्ट असलेले भरत अहीरे हे पत्नी राजश्री व तीन मुलींसह राहत होते. राजश्रीचे चंद्रशेखर पदयाची नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. भरतने या नात्याचा विरोध केला असता, राजश्रीने उलट भरतवरच छळाचा आरोप केला.
१५ जुलै रोजी चंद्रशेखरने भरतला घराजवळील सार्वजनिक शौचालयाजवळ बोलावले. त्याठिकाणी चंद्रशेखर आणि त्याचा मित्र रंगा यांनी भरतला बेदम मारहाण केली. रंगाने भरतला पकडले असताना चंद्रशेखर त्याच्या छातीवर वारंवार घाव घालत होता. या सर्व घटनेदरम्यान राजश्री देखील तिथे उपस्थित होती, मात्र तिने काहीच न करता शांतपणे उभं राहिल्याचं समोर आलं आहे.
भरत गंभीर जखमी झाल्यानंतरही राजश्रीने त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी घरीच ठेवले. तीन दिवस तो वेदनेत तडफडत राहिला. अखेर रक्ताच्या उलट्या सुरू झाल्यानंतर मुलीने नातेवाइकांना याची माहिती दिली आणि भरतला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथेही राजश्रीने अपघाताची खोटी कथा रंगवण्याचा प्रयत्न केला.
डॉक्टरांना मारहाणीचा संशय आल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली. दरम्यान भरतच्या मोठ्या मुलीने दिलेल्या साक्षीने सर्व प्रकार स्पष्ट झाला. तिच्या साक्षीवरून राजश्रीला अटक करण्यात आली असून, चंद्रशेखर व रंगा सध्या फरार आहेत.
या धक्कादायक प्रकरणाने विवाहबाह्य संबंध कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे भयावह चित्र समोर आले आहे.