
मुंबई प्रतिनिधी
मुलींचा जन्मदर वाढावा आणि त्यांना आर्थिक बळ मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राबवलेली ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना अनेक कुटुंबांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेत पात्र कुटुंबांना एकूण ₹१ लाख १ हजारांचा लाभ मिळतो.
२०१६ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास आर्थिक मदत दिली जाते. सुरुवातीला फक्त वार्षिक उत्पन्न ₹१ लाखापर्यंत असलेल्या कुटुंबांना लाभ मिळत होता. मात्र, शासनाने उत्पन्नाची मर्यादा वाढवून ती ₹७.५ लाख केली आहे.
लाभांचा हप्ता असा मिळतो
* मुलीच्या जन्मानंतर – ₹५,०००
* पहिलीत प्रवेश घेतल्यावर – ₹६,०००
* सहावीत प्रवेश घेतल्यावर – ₹७,०००
* अकरावीत प्रवेश घेतल्यावर – ₹८,०००
* १८ वर्षांची झाल्यावर – ₹७५,०००
याशिवाय, मुलीच्या नावावर ₹५०,००० जमा केले जातात आणि ₹१ लाखाचा अपघात विमा मिळतो. एका कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो.
उद्दिष्ट आणि फायदे
‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि शिक्षण, आरोग्य व स्वावलंबनासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देते. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे.
सरकारकडून सांगण्यात आले आहे की, या योजनेमुळे मुलगी जन्माला घालण्याविषयी सकारात्मकता वाढत असून, मुलींच्या शिक्षणाचा दरही सुधारतो आहे.