
मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना यंदा गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशी ऐवजी नारळीपौर्णिमा (८ ऑगस्ट) आणि ज्येष्ठगौरी विसर्जन (२ सप्टेंबर) यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जाहीर केलं असून, यामुळे यंदा गोविंदा आणि बाप्पाच्या विसर्जन दिवशी सुट्टी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शासन निर्णयानुसार, या सुट्ट्या फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात लागू असतील.
याच पार्श्वभूमीवर, मुंबई विद्यापीठाने देखील शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या असून, त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान शाखा, फार्मसी तसेच डिस्टन्स लर्निंग व ऑनलाइन परीक्षा यांचा समावेश आहे.
सुट्टीच्या नव्या निर्णयामुळे दहीहंडी आणि गणेश विसर्जन दिवशी कार्यालये सुरू राहणार आहेत. यामुळे गोविंदा पथकांसह अनेक गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार, वरील निर्णय “पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/II/बी, दिनांक ५ नोव्हेंबर १९५८” या शासन आदेशाच्या तरतुदीनुसार घेण्यात आला आहे.