मुंबई प्रतिनिधी
राज्य प्रशासनात आपली धडाकेबाज कामगिरी आणि शिस्तप्रिय कारभारासाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. असंघटीत कामगार विभागाच्या आयुक्तपदावर कार्यरत असलेले मुंढे यांची आता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदल्याचे आदेश राज्य शासनाने अधिकृतपणे जारी केले आहेत.
तुकाराम मुंढेंच्या बदल्यांची साखळी कायम
राजकारण्यांना व शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमालूम सवयींना धक्का देणारे मुंढे यांनी गेल्या 20 वर्षांत 23 वेळा बदलीचा सामना केला आहे. एका अधिकाऱ्याने इतक्या वेळा बदलीचा अनुभव घेणे हे प्रशासनातील एक वेगळा विक्रमच ठरत आहे. काम करताना मुंढे नेहमीच नियम आणि प्रक्रियांवर ठाम राहतात, त्यामुळेच सत्ताधारी व वरिष्ठ अधिकारी अस्वस्थ होतात, अशी प्रशासनात चर्चा आहे.
सत्ताधाऱ्यांना झेपेना मुंढे यांची शिस्त
तुकाराम मुंढे यांनी जिथे जिथे काम केले, तिथे शिस्तीची लाथ बसली. सरकारी कार्यालयातील हजेरी वेळ, लालफितीचा कारभार, राजकीय हस्तक्षेप – हे सगळे त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला. परिणामी, कर्मचारी नाराज झाले आणि अनेकदा सत्ताधाऱ्यांच्याही नाराजीचा फटका त्यांना बसला.
दिव्यांगांसाठी आशेचा किरण!
दिव्यांग कल्याण विभाग हा अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेला विभाग मानला जातो. मात्र, मुंढे यांची या विभागात सचिवपदी नेमणूक झाल्याने आता दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर अधिक वेगाने आणि नियमानुसार तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रालयाच्या फेऱ्यांतून थकलेल्या अनेक दिव्यांग नागरिकांसाठी ही सकारात्मक घडामोड ठरू शकते.
इतर अधिकाऱ्यांच्याही बदल्या
राज्य शासनाने केवळ तुकाराम मुंढेंची नव्हे, तर आणखी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे:
1. नितीन काशीनाथ पाटील – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांची बदली विशेष आयुक्त, राज्य कर, मुंबई या पदावर.
2. अभय महाजन – विशेष आयुक्त, राज्य कर, मुंबई यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ या पदावर.
3. ओंकार पवार – सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी (नाशिक) यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक या पदावर.
4. आशा अफजल खान पठाण – सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांची बदली महासंचालक, वनमती, नागपूर या पदावर करण्यात आली असून त्या सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय या पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळणार.
तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत
विभाग कोणताही असो, मुंढे यांचा कारभार ठाम असतोच. यावेळी दिव्यांग कल्याण विभागात ते काय बदल घडवतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यांच्या या बदल्येमागे राजकीय अस्वस्थता की प्रशासकीय गरज, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एक गोष्ट नक्की – तुकाराम मुंढे यांच्याशी सामना करणं सत्तेच्याही पचनी पडलेलं नाही!


