
मुंबई, प्रतिनिधी
मुंबईतील प्रवाशांना होणाऱ्या प्रचंड गर्दीच्या समस्येला उतारा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच मुंबईकरांना दरवाजे बंद नॉन-एसी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करता येणार असून, याशिवाय 12 ऐवजी 15 डब्यांची लोकल ट्रेनसुद्धा उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार यांनी दिली. डिसेंबर 2025 पासून या सुविधेचा शुभारंभ होणार आहे.
सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर सतीश कुमार माध्यमांशी बोलत होते. या बैठकीत रेल्वेच्या पायाभूत सुविधांबाबत आणि आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
मुंबई लोकल प्रवाशांना हायटेक सुविधा
सध्या उघड्या दरवाज्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता नॉन-एसी क्लोज डोअर लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला बळ मिळणार आहे. गर्दीच्या वेळात 15 डब्यांची लोकल चालवल्याने प्रवाशांची दैनंदिन कोंडी काहीअंशी सुटण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा
बैठकीत मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे लाईन विस्तारीकरणाच्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान 5वी व 6वी लाईन, विरार-डहाणू चौथी लाईन, कल्याण-कसारा आणि कल्याण-बदलापूर नवीन ट्रॅक प्रकल्प, तसेच कुर्ला ते परळ दरम्यानच्या पाचव्या व सहाव्या लाईनच्या प्रगतीचा तपशील देण्यात आला.
17 उपनगरीय स्थानकांचा कायापालट
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (MRVC) वतीने 17 उपनगरीय स्थानकांच्या विकासकामांमध्ये प्रगती झाल्याचे निदर्शनास आले. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला असून, प्रवाशांच्या सुरक्षेसह सुविधा वाढवण्यावर विशेष भर दिला जात आहे.
‘विकसित भारत 2047’ मध्ये रेल्वेचा महत्त्वाचा वाटा
“विकसित भारत 2047” या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या भुमिकेबाबतही चर्चा झाली. या उपक्रमात रेल्वेच्या योगदानाचा दर्जा वाढवण्यासाठी विविध स्तरांवर काम सुरू आहे.
मुंबईकरांनो, डिसेंबरपासून तुमच्या प्रवासात दरवाजे बंद लोकल आणि अतिरिक्त डब्यांची सुविधा असणारी लोकल सोबत येणार आहे. सुरक्षित आणि आरामदायक प्रवासासाठी रेल्वे आता अधिक सज्ज होत आहे.