
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : मोबाईल चोरी आणि गहाळ प्रकरणांवर उपाययोजना म्हणून मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ४ ने राबवलेली विशेष मोहीम मोठ्या यशाची ठरली आहे. १५ दिवसांच्या या मोहिमेत तब्बल ३४७ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून, तक्रारदारांना एकूण ५६ लाख ३० हजारांहून अधिक किमतीची मालमत्ता परत करण्यात आली.
ही मोहीम २० जुलै ते ५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबवण्यात आली. २०२२ ते २०२५ दरम्यान चोरी किंवा गहाळ झालेल्या मोबाईल्सचा तपशील संकलित करून, तांत्रिक विश्लेषण आणि ट्रॅकिंगद्वारे शोध घेण्यात आला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्यांमध्येही पोलिसांची पथके पाठवण्यात आली होती.
हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल्सपैकी
२०२२ मधील : ४८
२०२३ मधील : ३४
२०२४ मधील : ९६
२०२५ मधील : १६९ मोबाईल
या मोहिमेचा समारोप ६ ऑगस्ट रोजी सायन येथील नॉर्थ इंडियन असोसिएशनमध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी तक्रारदारांना मोबाईल्स अधिकृतरित्या परत करण्यात आले.
ही मोहीम मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (का. व सु.) सत्यनारायण, अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ४) रागसुधा आर. यांच्या नेतृत्वात राबवण्यात आली.
या कारवाईमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.