
नाशिक प्रतिनिधी
पश्चिम बंगालमधील बॉम्बस्फोट प्रकरणातील एक दहशतवादी थेट नाशिकमध्ये नोकरी करत असल्याचे उघड झाले असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या मदतीने त्याला गुप्त कारवाईत अटक केली आहे. ही कारवाई यशस्वी केल्याबद्दल एनआयएने युनिट-१ ला प्रशस्तिपत्रही प्रदान केले.
मात्र, हा संशयित सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत मुक्तपणे काम करत होता आणि शहरात वास्तव्यास होता, याची खबर नाशिक पोलिस किंवा त्यांच्या गुप्तचर विभागाला नव्हती. त्यामुळे शहराच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महिनाभरापूर्वीच आली होती एनआयएची टीम
महिनाभरापूर्वी एनआयएचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले होते. पश्चिम बंगाल बॉम्बस्फोटातील संशयिताचा शोध घेण्यासाठी सातपूर परिसरात गुप्त मोहीम राबवण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
या मोहिमेत गुप्तता राखण्यात आली, मात्र या आधी स्थानिक पोलिसांना संशयिताच्या शहरातील उपस्थितीची कल्पनाही नव्हती.
पूर्वीही तसाच प्रकार, तरीही बेपर्वाई
२०१० सालीही सातपूर परिसरातून बिलाल शेख नावाचा दहशतवादी अटकेत आला होता. त्याने नाशिकमधील संवेदनशील भागांची रेकी केली होती. त्या घटनेनंतर परप्रांतीयांची तपासणी, ओळखपत्र पडताळणी आणि गुप्त पाहणीसाठी आदेश दिले गेले होते. मात्र, ते आदेश कागदावरच राहिल्याचे या नव्या प्रकरणातून पुन्हा स्पष्ट झाले.
बनावट आधारकार्डावर नोकरी
एनआयएच्या सूत्रांनुसार, अटकेत असलेला संशयित बनावट आधारकार्ड वापरून सातपूरमधील कंपनीत काम करत होता. ही बाब उघड होताच शहरातील सुरक्षा व्यवस्थेतील बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला.
प्रशंसा आणि प्रश्न दोन्ही
एनआयएने युनिट-१ च्या पथकाचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत प्रशस्तिपत्र दिले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही पथकाचे अभिनंदन केले. मात्र, या घटनेने स्थानिक गुप्तचर यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षावर व सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकत नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण केले आहेत.