
मुंबई प्रतिनिधी
राजकीय गडबडीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंब आज एकाच छताखाली एकत्र आलं, तेही आनंदाच्या क्षणासाठी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव, तरुण नेते युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आज (३ ऑगस्ट) मुंबईत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
प्रभादेवी येथील इंडिया बुल्स बिल्डिंगमध्ये पारंपरिक पद्धतीने झालेल्या या सोहळ्यास खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते.
साखरपुड्याची गोड बातमी सर्वप्रथम सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर फोटोसह शेअर केली. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा हा सोहळा पवार घराण्याला पुन्हा एकत्र आणणारा ठरला.
कोण आहेत तनिष्का कुलकर्णी?
युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नी तनिष्का कुलकर्णी या मूळ मुंबईच्या असून त्यांनी परदेशातून फायनान्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र-तनिष्का यांच्या छायाचित्रांना सोशल मीडियावर टाकत नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी युगेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार यांनी “अक्षता टाकायची संधी कधी देताय?” असा हजरजबाबी प्रश्न केला होता. आजोबांचा तो सल्ला युगेंद्र यांनी मनावर घेतल्याचे या सोहळ्यातून स्पष्ट झाले.
राजकारणातून वैयक्तिक क्षणांकडे
युगेंद्र पवार यांनी अलीकडेच राजकारणात प्रवेश केला असून बारामती विधानसभा निवडणुकीत त्यांनी लढत दिली होती. पराभव झाला असला तरी त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आपली छाप पाडली होती.
सध्या मात्र पवार घराण्यात राजकीय चर्चेपेक्षा साखरपुड्याच्या आनंदाचीच भरभराट आहे. युगेंद्र-तनिष्का यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, आगामी विवाह सोहळ्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.