
मुंबई प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिलेलं आव्हान — “अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक कराच” — आता राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रत्युत्तर देत, राज ठाकरेंनी केलेलं विधान “कायदा न वाचता केलेलं” असल्याचं सांगितलं.
🕜 1.25pm | 2-8-2025📍Nagpur.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/uef08nVKi0
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 2, 2025
राज ठाकरेंचं आव्हान
पनवेलमध्ये शेकापच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले —
“सरकारने असा कायदा केला आहे की, जर कुठल्या प्रकल्पाला विरोध केला तर तुम्हाला ‘अर्बन नक्षल’ ठरवून अटक होऊ शकते. मग एकदा करूच द्या अटक. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा सन्मान राखूनच आणा.”
फडणवीसांचा पलटवार
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले —
“कुणाला अटक करायची यासाठी खास असा कायदा नाही. अर्बन नक्षलसारखं वागाल तर अटक होईल, पण राज ठाकरे तसे वागत नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्याचं कारण नाही. हा कायदा आंदोलकांना गप्प बसवण्यासाठी नसून, कायद्याविरोधात वागणाऱ्यांसाठी आहे. सरकारच्या विरोधात बोलण्याची पूर्ण मुभा आहे.”
भाषा वादावरही भूमिका स्पष्ट
मराठी शिकणं बंधनकारक असलं पाहिजे, असं स्पष्ट करत फडणवीस म्हणाले
“मराठीसोबत आणखी एक भारतीय भाषा शिकण्यात काही वावगं नाही. पण भारतीय भाषांना विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालण्याच्या मानसिकतेला मी विरोध करतो.”