रायगड प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाक्यावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाने बनावट व्हीआयपी पास तयार करून त्यांची विक्री केल्याचा प्रकार समोर आला असून, या गोरखधंद्यातून त्याने लाखोंची कमाई केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
खालापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार महाडिक असे या संशयित तरुणाचे नाव आहे. महाडिक हा खालापूर टोल नाक्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी त्याने व्हीआयपींना मिळणाऱ्या टोलमाफ पासांचे बनावट प्रती तयार करून ते वाहनचालकांना विकण्यास सुरुवात केली.
दरम्यान, व्हीआयपी पास धारकांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने टोल नाका प्रशासनाच्या संशयास सुरुवात झाली. तपासणीअंती काही वाहनचालकांकडे असलेले पास हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यावरून प्रशासनाने अधिक चौकशी केली असता या संपूर्ण रॅकेटचा सुत्रधार म्हणून ओंकार महाडिकचे नाव पुढे आले.
याप्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात महाडिकविरुद्ध फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि त्याचा वापर करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या रॅकेटमध्ये इतर कोणी सहभागी होते का, याचा सखोल तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकारामुळे टोल नाक्यावरील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, प्रशासनाकडून यंत्रणेत सुधारणा करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.


