
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपयांचा निधी येत्या दोन ते तीन दिवसांत थेट खात्यात जमा होणार आहे. महिला व बाल विकास विभागाने यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी 30 जुलै रोजी अधिकृतपणे मंजूर केला असून शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.
महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेतून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. जुलै 2024 पासून लागू झालेल्या या योजनेतून आतापर्यंत 13 हप्ते वितरित करण्यात आले असून, हा हप्ता 13वा ठरणार आहे.
महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी तपासणी मोहीमही राबवण्यात आली आहे. या छाननीदरम्यान तब्बल 26.34 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून, जून महिन्यापासून त्यांच्या खात्यातील निधी रोखण्यात आला आहे. मात्र, जून महिन्यात 2 कोटी 25 लाख महिलांना नियमित हप्ता वितरित करण्यात आला होता.
राज्य सरकारने योजनेसाठी एकूण 28290 कोटींची तरतूद केली असून, त्यातील 2984 कोटी रुपये केवळ जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 1500 रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार आहे.
योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, निधीच्या प्रतीक्षेचा आता शेवट होण्याची चिन्हं दिसत आहेत. योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी शासनाकडून नियमित छाननी सुरू असून, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचीही भूमिका घेतली जात आहे.