
मुंबई प्रतिनिधी
रक्षाबंधन २०२५ या वर्षी शनिवार, ९ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्रावण पौर्णिमेच्या या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्याचे नवं नातं पुन्हा एकदा बहरणार आहे. मात्र, या दिवशी राखी बांधण्यासाठी योग्य शुभमुहूर्ताचं पालन करणे अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा, धार्मिक दृष्टिकोनातून त्याचा परिणाम अशुभ मानला जातो.
कधी आहे शुभ मुहूर्त?
पारंपरिक पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी ८ ऑगस्ट रोजी दुपारी २:१२ वाजता सुरू होऊन ९ ऑगस्ट रोजी दुपारी १:२४ वाजता संपेल.
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त ९ ऑगस्ट रोजी सकाळी ५:४७ ते दुपारी १:२४ पर्यंत आहे.
या दरम्यान, दुपारी १:४१ ते २:५४ या वेळेत येणारा अपराह्न मुहूर्त सर्वात आदर्श काळ मानला जातो.
‘भद्रा’ काळात राखी नकोच!
पौर्णिमा तिथीच्या पहिल्या सहा तासांमध्ये येणारा भद्रा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे या वेळेत कोणताही शुभकार्य, विशेषतः राखी बांधणे टाळावे, असे धर्मशास्त्र सांगते.
हिंदू परंपरेनुसार शुभ मुहूर्ताचे पालन केल्याने कार्यात सकारात्मक ऊर्जा लाभते. सकाळी लवकर राखी बांधण्याची प्रथा असली तरी ती वेळ भद्राशी जुळल्यास ते टाळणे हितावह मानले जाते.
रक्षाबंधनाच्या दिवशी कशी करावी पूजा?
रक्षाबंधन दिवशी बहिणी पूजेची थाळी सजवतात. यामध्ये राखी, रोळी, तांदूळ, मिठाई, एक पेटलेला दिवा आणि इतर पूजासामग्री असते. त्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधतात, तिलक लावतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि आयुष्यभर रक्षणाचे वचन देतो.
त्यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन सात्विक भोजन करतो. यावेळी गोड पदार्थांचा खास बेत असतो.
पौराणिक कथा आणि रक्षाबंधन
रक्षाबंधनाचा उल्लेख कृष्ण-द्रौपदी, राणी कर्णावती-हुमायून यांच्या कथांमध्येही आढळतो. त्यामुळे या सणाला इतिहास आणि श्रद्धेचा अनोखा संगम आहे.
रक्षाबंधन म्हणजे केवळ एक सण नव्हे, तर भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव आहे. मात्र यंदा ९ ऑगस्ट रोजी राखी बांधताना भद्राकाळाचे भान ठेवूनच पूजा केली तरच खऱ्या अर्थाने शुभफल लाभेल.