
संभाजीनगर प्रतिनिधी
शहरातील करमाड परिसरात एका लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत सात महिलांची सुटका करण्यात आली आहे. यातील एक महिला स्थानिक असून सहा महिला परराज्यांतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. डमी ग्राहकाच्या इशाऱ्यानंतर पोलिस अधीक्षक विनायकुमार राठोड यांच्या विशेष पथकाने छापा टाकत हॉटेलचा पर्दाफाश केला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डमी ग्राहकाने केला इशारा, पोलिसांनी घेतली तत्काळ कारवाई
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून करमाड पोलिसांनी हसनाबादवाडी येथील ‘दिनेश लॉजिंग अँड बोर्डिंग’ या हॉटेलवर नजर ठेवली होती. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. ग्राहकाने हॉटेल व्यवस्थापक गणेश साळुंखे (वय 27, रा. अण्णाभाऊ साठे नगर, चिकलठाणा) याच्याकडे महिला मागितल्यावर साळुंखेने लगेच होकार देत पाचशे रुपये घेऊन खोली क्रमांक 105 मध्ये पाठवले. काही वेळातच संबंधित महिला खोलीत आली आणि डमी ग्राहकाने गॅलरीत येऊन पोलिसांना इशारा केला.
हॉटेलवर छापा, देहव्यापाराचा अड्डा उघड
इशारा मिळताच पोलीस अधीक्षक राठोड, उपविभागीय अधिकारी पूजा नागरे, सहाय्यक निरीक्षक सरला गाडेकर, उपनिरीक्षक विनोद भालेराव, प्रताप नवघरे आणि स्वप्निल नरवडे यांच्या पथकाने हॉटेलवर धाड टाकली. छाप्यात देहव्यापारासाठी जबरदस्तीने वापरल्या जात असलेल्या ७ महिलांची सुटका करण्यात आली. त्यात एक महिला स्थानिक असून सहा महिला विविध राज्यांतील आहेत.
दोन आरोपी अटकेत, ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त
या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक गणेश साळुंखे आणि एजंट राजेश मगरे (वय 26, रा. देवगाव तांडा, ता. बदनापूर, जि. जालना) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ९५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची कारवाई कौतुकास्पद
पोलीस अधीक्षक कार्यालयाने केलेली ही कारवाई संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. शहरातील अशा गैरकृत्यांना आळा बसावा, यासाठी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि नियोजन कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून उमटत आहे.