
लातूर प्रतिनिधी
विधानभवनात रमी खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्या, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ जुलैला लातूरमध्ये पाय ठेवू नये! असा थेट इशारा छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.
राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांच्या जळजळीत प्रश्नांवर चर्चा करायची सोडून मंत्री महोदय मोबाईलवर रमी खेळत बसले! या बेजबाबदारपणाचा संताप आता उफाळून आला असून, छावा संघटना आक्रमक पवित्र्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचा लातूर दौरा २६ जुलै रोजी होणार असला तरी, त्याआधीच कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही, तर त्यांना लातूरमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही, असा ठणकाव जावळे पाटील यांनी केला आहे. इतकंच नाही, तर “केवळ मुख्यमंत्री नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीसुद्धा रस्त्यावर फिरू शकणार नाहीत,” असा रोखठोक इशारा त्यांनी दिला.
चव्हाणांवर हल्ल्याचा भडका
छावा संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे गेले असताना, सूरज चव्हाण व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्याने वातावरण चिघळले असून, छावाचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत.
राजकीय दबावामुळेच असावा, पण अखेर अजित पवारांनी सूरज चव्हाण यांचा युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. मात्र, छावा संघटना इतक्यावर थांबणार नाही. जावळे म्हणाले, “ज्याने आमच्या कार्यकर्त्यांना हात लावला, त्याला आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवूच!”
सकल मराठा समाजही रणशिंग फुंकणार
कोकाटेंचा थेट राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक अॅड. उदय गवारे यांनी करत २५ जुलैची डेडलाइन दिली आहे. त्या आत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
गवारे म्हणाले, “कोकाटे हे विवेकशून्य मंत्री आहेत. त्यांनी याआधी ‘कृषी विभाग ही ओसाड गावाची पाटीलकी आहे’, ‘ढेकाळ्याचे पंचनामे करायचे का?’ अशी अनेक बेजबाबदार विधाने केली आहेत. असा मंत्री सरकारमध्ये राहणे म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे.”
रमी खेळणारा मंत्री, कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे पदाधिकारी, आणि सत्तेचा माज…
हेच का तुमचे लोकशाहीचे संस्कार?
छावा संघटना आणि मराठा समाजाचा उद्रेक चूक म्हणता येणार नाही. प्रश्न पिक विम्याचा असो वा पंचनाम्याचा – जबाबदारी झटकणाऱ्या आणि विधानभवनात रमी खेळणाऱ्या मंत्र्यांची गच्छंती होणे ही वेळेची गरज आहे.