
नवी दिल्ली वृत्तसंस्था
बांगलादेशात सोमवारी दुपारी एक धक्कादायक दुर्घटना घडली. राजधानी ढाका येथील उत्तरा परिसरातील माइलस्टोन शाळा आणि कॉलेजच्या इमारतीवर बांगलादेश हवाई दलाचे एफ-७ प्रकारचे ट्रेनर विमान कोसळले. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर धुराचे लोट व विमानाचे अवशेष दाखवणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
VIDEO | Dhaka: Bangladesh Air Force training jet crashes into a school in Dhaka, killing at least one person, fire official says. More details awaited.
(Source: PTI Videos) pic.twitter.com/bzXMGqJTEE
— Press Trust of India (@PTI_News) July 21, 2025
ही दुर्घटना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता घडली. विमानाने दुपारी १.०६ वाजता उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या २४ मिनिटांत हे चिनी बनावटीचं विमान कोसळलं. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एफ-७ विमान हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होतं.
शाळेवर कोसळलं विमान, एकाचा मृत्यू, अनेक जखमी
या अपघातात सध्या एकाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अनेक विद्यार्थी व स्थानिक नागरिक जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी तात्काळ सैन्य, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दलाची ८ पथकं दाखल झाली आणि बचाव कार्य सुरू केलं.
घटनास्थळावर धुराचे लोट, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
विमान कोसळताच माइलस्टोन स्कूल परिसरात मोठा स्फोट झाला. सोशल मीडियावर पसरलेल्या व्हिडिओंमध्ये धुराचे लोट, आगीचे स्फोट, आणि घबरलेल्या लोकांचा गोंधळ दिसून येतो आहे. अनेकांनी या घटनेची तुलना गेल्या काळात अहमदाबादमध्ये घडलेल्या विमान अपघाताशी केली आहे.
अधिकृत मृत्यूसंख्येची प्रतीक्षा
दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी व यंत्रणांकडून तपास सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप मृतांची अधिकृत संख्या जाहीर झालेली नाही.
बांगलादेशातील ही विमान दुर्घटना पुन्हा एकदा प्रशिक्षण विमानांच्या सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत आहे. दरम्यान, देशभरातून या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.