
मुंबई प्रतिनिधी
मुंबई | वांद्रे (पूर्व) स्थानक परिसरात अवैध रिक्षा व टॅक्सींचा सुळसुळाट तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई उपस्थित होते.
नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींमध्ये अवैध रिक्षांची गर्दी, जादा भाडे आकारणे, जवळच्या अंतरावर प्रवासी नेण्यास नकार देणे आणि हुज्जत घालणे या मुद्द्यांचा समावेश होता. याबाबत मंत्री सरनाईक यांच्यासमोर सविस्तर चर्चा झाली.
मागील अधिवेशनात अशाच प्रकारची बैठक झाली होती आणि त्यावेळी तक्रार नोंदविण्यासाठी WhatsApp क्रमांक देण्यात आला होता. मात्र त्याची योग्य जनजागृती झाली नसल्याने तो उपक्रम प्रभावी ठरला नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली.
यावर मंत्री सरनाईक यांनी सोमवारपासून वांद्रे स्थानकावर विशेष अंमलबजावणी मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच तक्रार निवारण WhatsApp क्रमांकाची व्यापक प्रसिद्धी करण्याचेही निर्देश दिले.
या मोहिमेत अवैध रिक्षा-टॅक्सीवर कारवाई, कागदपत्रांची तपासणी आणि जादा भाडे आकारणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना सुलभ तक्रार नोंदणीसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे.