
मुंबई प्रतिनिधी
बांद्रा |बांद्रा (पूर्व) येथील भारत नगर परिसरातील नमाज कमिटी मशिदीजवळील चाळ क्रमांक ३७ गुरुवारी पहाटे कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुमारे ३०x३० फूट क्षेत्रफळाची ग्राउंड प्लस दोन मजली (G+2) एमएस शीट व लोड-बेअरिंग एसीसी शीट रचना पहाटे ५.५६ वाजता कोसळली. दुर्घटनेची नोंद होताच मुंबई अग्निशमन दलाने (MFB) लेव्हल-II अलर्ट जारी करून बचावमोहीम सुरू केली.
बचावकार्य युद्धपातळीवर
घटनास्थळी एमएफबीचे अधिकारी व पथके, पोलिस, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभाग, अदाणी पथक आणि इतर यंत्रणा दाखल झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही दोघे अडकले असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून शोधमोहीम सुरू आहे. बचावासाठी २ अतिरिक्त विभागीय अग्निशमन अधिकारी (ADFO), ५ वरिष्ठ अधिकारी, ५ फायर इंजिन, १ मोटर वॉटर टँकर, १ फोम टँकर, १ रेस्क्यू व्हॅन आणि १०८ अॅम्ब्युलन्स सेवेची तैनाती करण्यात आली आहे. परिसर सुरक्षा तारबंदीत घेण्यात आला असून उर्वरित धोकादायक संरचना पाडण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
१२ जखमी; दोघांची प्रकृती गंभीर
बांद्रा भाभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले. त्यापैकी रेहाना अन्सारी (६५) आणि मोहम्मद अन्सारी (६८) यांना सुमारे ५० टक्के भाजल्या गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून दोघांनाही तातडीने केईएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
इतर १० जखमींची प्रकृती स्थिर असून ते भाभा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यात मोहम्मद लारेब इरफान (८), मुस्तफा इब्राहिम सैय्यद (५७), शबाना मुस्तफा सैय्यद (४२), नुरी इरफान खान (३५), मोहम्मद इरफान खान (५०), अब्दुल रहमान इरफान खान (२२), अल्फिया मुस्तफा सैय्यद (१८), आलिया मुस्ताक सैय्यद (१६), जाफर जमाल खान (अंदाजे ८०) आणि शार्मिन शेख (३२) यांचा समावेश आहे.
घटनास्थळावरील ढिगारा पूर्णपणे दूर होईपर्यंत आणि सर्वांचा शोध लागत नाही तोवर बचावकार्य सुरू राहणार आहे, अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षिततेच्या दृष्टीने आसपासच्या बांधकामांची स्थितीही तपासली जाणार आहे.