
मुंबई प्रतिनिधी
राज्यात महायुती सरकारकडून घेतले जाणारे एकापाठोपाठ एक जनहिताचे निर्णय चर्चेचा विषय ठरत आहेत. आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही एक दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील शासकीय कर्मचाऱ्यांना आता अर्धा तास उशिरा कार्यालयात हजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. याआधी ही सवलत केवळ 10 मिनिटांची होती.
राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजला. कांदिवली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील लोकल रेल्वेत होणाऱ्या अपघातांचा मुद्दा सभागृहात मांडल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.
सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना ‘लेटमार्क’पासून दिलासा मिळणार असून, कार्यालयात हजेरी लावण्यासाठी घाईगडबडीने धावपळ करण्याची गरज भासणार नाही. रेल्वे अपघातांवर आळा घालणे, प्रवाशांची गर्दी कमी करणे आणि प्रवास अधिक सुरक्षित बनवणे, हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे.
फक्त मुंबईसाठीच लागू
तत्पूर्वी, ही सवलत संपूर्ण राज्यासाठी लागू न करता, सध्या तरी फक्त मुंबईतील शासकीय कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे. परंतु, भविष्यात याचा विस्तार करण्याचा विचार सरकार करत आहे.
सरनाईक म्हणाले, “अर्धा तास उशिरा कामाला सुरुवात केली, तरीही एकूण कामाचे तास बदलणार नाहीत. संध्याकाळी तितक्याच वेळेने काम संपेल.”
खासगी क्षेत्रासाठीही टास्क फोर्स
सरकारने ही सवलत केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरतीच न ठेवता, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेळेच्या लवचिक नियोजनासाठीही टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे. कार्यालयीन वेळा लवचिक ठेवल्यास, रेल्वेवरील ताण कमी होईल आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढेल, असा सरकारचा विश्वास आहे.
सरनाईक म्हणाले, “ही वेळेची सवलत छोटासा बदल वाटू शकतो, पण दररोज लाखो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तो मोठा दिलासा ठरेल.”
प्रवाशांना मेट्रोसाठी प्रोत्साहन
सरनाईक यांनी स्पष्ट केलं की, मंत्र्यांच्या माध्यमातून नागरिकांना मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक मार्गांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे.
महायुती सरकारच्या या निर्णयामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांना लेटमार्कपासून सुट मिळणार आहे, तर दुसरीकडे मुंबईतील वाढत्या लोकल अपघातांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नही होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचं शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये स्वागत केलं जात असून, हा निर्णय लाखो मुंबईकर प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरणार आहे.