
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शाळा व महाविद्यालयांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कवाढीला सरकार आता लगाम घालणार आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत मोठी घोषणा करत एक सर्वसमावेशक कायदा आणण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पालकांच्या खिशाला बसणारा अतिरिक्त आर्थिक फटका थांबण्याची शक्यता आहे.
राज्यातील काही खासगी शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षणाबरोबरच ‘इंटिग्रेटेड अभ्यासक्रम’, ‘सामायिक शिकवण्या’, ‘इमारत निधी’, ‘ग्रंथालय शुल्क’, ‘प्रयोगशाळा शुल्क’ किंवा सहलीच्या नावाखाली अनधिकृत शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
पालकांच्या तक्रारींची गंभीर दखल
या मुद्द्यावर विधानसभेत आमदार महेश चौगुले, योगेश सागर आणि वरुण सरदेसाई यांनी आवाज उठवला. या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, “शाळा व महाविद्यालयांकडून होत असलेल्या बेकायदेशीर शुल्कवसुलीवर आता कठोर कारवाई केली जाईल. लवकरच एक व्यापक कायदा आणण्यात येईल.”
कायद्यात होणार सुधारणा, कारवाईला मिळणार आधार
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियमानुसार, कोणतीही मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालय शासनमान्य शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारू शकत नाही. तरीही प्रत्यक्षात शाळा विविध कारणांनी अतिरिक्त शुल्क मागतात. यामुळे पालकांच्या नाइलाजाचा गैरफायदा घेतला जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.
पालक शिक्षक संघ अनिवार्य
प्रत्येक शाळेत पालक-शिक्षक संघाची स्थापना बंधनकारक करण्यात आली असून, या संघाच्या संमतीशिवाय शुल्क वाढ करता येणार नाही, असा स्पष्ट कायदेशीर निकष असताना देखील अनेक शाळा या नियमाला डावलत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाच्या वतीने यावर कारवाईचे निर्देश जारी करण्यात येणार आहेत.
कायद्याची अंमलबजावणी कितपत प्रभावी?
सरकारच्या या घोषणेनंतर आता खऱ्या अर्थाने बेकायदेशीर शुल्कवाढीला आळा बसेल का, कायद्याची अंमलबजावणी किती प्रभावी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी सरकारचा हा ‘ब्रेक’ किती ठरतो परिणामकारक, हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल.
जर आपली शाळा अथवा महाविद्यालय बेकायदेशीर शुल्क आकारत असेल, तर शैक्षणिक शुल्क विनियमन समितीकडे तक्रार दाखल करता येते. तसेच पालक-शिक्षक संघाच्या माध्यमातूनही आवाज उठवता येतो.