
पंढरपूर प्रतिनिधी
सिनेमाची कथा वाटावी अशी थरारक घटना मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात उघडकीस आली आहे. विवाहितेने दिरासोबतचे अनैतिक प्रेमसंबंध टिकवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून एका वेडसर महिलेला जिवंत पेटवून दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे संपूर्ण पंढरपूर परिसर हादरला असून, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास नागेश सावंत यांच्या पत्नी किरण सावंत हिने आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी सापडलेला मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटवणं अशक्य होतं. किरणच्या वडिलांनीही मृतदेह ओळखू शकले नाहीत. मात्र किरणच्या अचानक मृत्यूबाबत त्यांनी संशय व्यक्त केला आणि पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी केली.
पोलिसांनी तपासाचा रोख नागेश सावंत याच्या भावाकडे – निशांत सावंतकडे वळवला. मोबाईल कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) तपासल्यानंतर निशांत व किरण यांच्यातील प्रेमसंबंध उघडकीस आले. पोलिसांनी निशांतला ताब्यात घेऊन केलेल्या कसून चौकशीत खळबळजनक सत्य समोर आले – किरण जिवंत होती, आणि कराडमध्ये लपून राहत होती.
खऱ्या मृत महिलेचं रहस्य
प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कडब्याच्या गंजीत जी महिला जळून मेली, ती किरण नव्हती. पोलिसांनी अधिक तपास केला असता निशांत आणि किरण यांनी एका मानसिक आजाराने ग्रस्त, बेवारस महिलेला फसवून आणले आणि तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह किरण असल्याचे भासवण्यासाठी पेटवून दिला गेला. या भयंकर कटातून दोघंही एकत्र राहू शकतील, असा त्यांचा डाव होता.
पोलिसांनी कराड येथून किरणला ताब्यात घेतले असून, तिच्या दिराला – प्रियकराला – निशांतलाही अटक करण्यात आली आहे. दोघांविरुद्ध खून, पुरावे नष्ट करणे, आणि फसवणुकीसह विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास अधिक गहिरा…
सध्या पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून, या प्रकरणातील अन्य सहकारी, मदत करणारे, आणि मृत वेडसर महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या गुन्ह्याने प्रचंड खळबळ माजवली असून, “प्रेमाच्या अंधाधुंदीत माणूस किती विकृत पातळीवर जाऊ शकतो?” हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.