
अलिबाग प्रतिनिधी
महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि कोकणातील वाहनचालकांसाठी महत्त्वाचा असलेला आंबेनळी घाट मार्ग आता महिनाभर अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, १५ ऑगस्टपर्यंत घाटात अवजड वाहतुकीस पूर्ण बंदी असणार आहे.
अतिवृष्टीमुळे घाटमाथ्यावर सात ते आठ ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी देखील घाट मार्ग पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला होता, मात्र हवामान खालावल्याने बंदीचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
रात्रौ व रेड-ऑरेंज अलर्टच्या वेळी सर्व वाहतूक बंद
दरम्यान, फक्त अवजडच नव्हे, तर हवामान विभागाकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर झाल्यास हलक्या वाहनांनाही घाटात प्रवेश नाकारण्यात येणार आहे. तसेच, रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारची वाहतूक घाटात जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरड कोसळल्यास जीवितहानीचा धोका
आंबेनळी घाट हा ४० किमीचा वळणदार आणि खोल दऱ्यांनी वेढलेला मार्ग असून, शनिवार-रविवारी येथे पर्यटकांची विशेष गर्दी असते. अशा वेळी दरड कोसळल्यास मोठ्या जीवितहानीचा धोका निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
वाहतूक वळविण्याचे पर्यायी मार्ग
महाबळेश्वरसाठी येणारी वाहतूक: माणगाव–ताम्हिणी घाट–पुणे–सातारा मार्गे
कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक: चिपळूण–पाटण–सातारा–कोल्हापूर मार्गे वळवली जाणार
महाड पोलादपूर प्रांताधिकारी कार्यालय, रायगड पोलीस, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शिफारसीनंतर ही अधिसूचना तातडीने लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने प्रवाश्यांना रात्रचा प्रवास टाळण्याचे आणि हवामानाचे अपडेट पाहूनच घाटात जाण्याचे आवाहन केले आहे.
आता महाबळेश्वरला जाण्यापूर्वी दोन वेळा विचार करा…
तुमचा प्लॅन घाटात अडकू नये म्हणून हवामान पाहा, पर्यायी मार्ग वापरा आणि सुरक्षित राहा!