
नाशिक प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या गांजाच्या मोठ्या साठ्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. ओरिसाहून मुंबईकडे नेण्यात येणारा तब्बल १२१ किलो ४२९ ग्रॅम गांजा जप्त करत ३६ लाख २९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी तीघांना अटक करण्यात आली असून एक सराईत गुन्हेगार फरार झाला आहे. फरार झालेला आरोपी टिप्पर गँगचा कुख्यात गुंड सुनील अनार्थे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांची योजनाबद्ध कारवाई
अमली पदार्थांची वाहतूक थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवणाऱ्या नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार समृद्धी महामार्गावर सापळा रचण्यात आला होता. ओरिसाहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन वाहनांवर लक्ष ठेवण्यात आले होते. एक पांढऱ्या रंगाची होंडा अमेझ कार मुंबईकडे जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान, मारुती स्विफ्ट कार पोलिसांना पाहताच नागपूरच्या दिशेने वळवली गेली. या पाठलागात स्विफ्ट कार जप्त करण्यात आली तर अमेझ कार शिवडे परिसरात सोडून देत सुनील अनार्थे फरार झाला. अंधाराचा फायदा घेत त्याने पळ काढल्याचा अंदाज आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी
या कारवाईत पोलिसांनी भारत नारायण चव्हाण (अहिल्यानगर), तुषार रमेश काळे आणि संदीप कचरू भालेराव या तिघांना अटक केली आहे. अटक आरोपींकडून प्राथमिक चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीवरून गांजाची तस्करी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर परिसरात विक्रीसाठी करण्यात येत होती, असे उघड झाले आहे.
दोन पोलीस कर्मचारी जखमी
फरार आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती अधीक्षक पाटील यांनी दिली. यातील एक गाडी भाडे तत्वावर घेण्यात आली होती, तर दुसरी चोरीची असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कारवाई
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने पार पाडली.