
नाशिक प्रतिनिधी
चोरीची दुचाकी विक्रीतून हजारो रुपये मिळतात. पण बुलेट विकली तर ४० ते ५० हजार मिळतात, म्हणून बुलेट चोरी करण्यात हातखंडा झालेल्या बुलेटचोरांच्या शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
त्याच्याकडून नाशिक शहर परिसरातून चोरीस गेलेल्या सहा बुलेट जप्त करण्यात आल्या असून, ज्याला बुलेट विकायचा त्यालाही पुण्यातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन गेम आणि मौजमजेसाठी त्याला बुलेट चोरीचा नाद लागला होता.
अभय सुरेश खडे (२३, रा. झोळे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), अनिकेत शिरिष पठारे (२५, रा. दापोडी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. २८ मेस इंदिरानगर हददीतील पाथर्डी शिवारातून बुलेट चोरीला गेली होती. गेल्या तीन- चार महिन्यांमध्ये अशा घटना वाढल्या होत्या. ही बाब हेरून शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने बुलेट चोरीच्या घटनांचा तपास सुरू केला. तब्बल ३५ सीसीटीव्ही तपासून संशयिताला शोधले. तांत्रिक विश्लेषणानुसार पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला.
उपनिरीक्षक पठाण, संजय सानप यांना संशयित अभय खर्डे हा चोरीची बुलेट विक्री करण्यासाठी सिन्नर फाट्याहून एकलहराकडे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, युनिट दोनचे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अभय खर्डे यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक लाखांची चोरीची बुलेट (एमएच १५ जीवाय ६९३५), मोबाईल असा १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही बुलेट त्याने भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे कबुल केले. चौकशीमध्ये त्याने चार महिन्यात नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून सहा बुलेट चोरल्याची कबुली दिली. या चोरीच्या बुलेटही जप्त करण्यात आल्या. चोरीच्या बुलेट पुण्यात अनिकेत पठारे यास विक्री करीत असल्याने त्यालाही पुण्यातून अटक करण्यात आली. दोघांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुण्यातून १८ बुलेट चोरल्या
अभयचा बुलेट चोरीत हातखंडा झाला होता. पुण्यात काही वर्षात १८ बुलेट चोरल्या असून शहर -ग्रामीण पोलिसात १८ गुन्हे दाखल आहेत. चाकण येथील बुलेट चोरीच्या गुन्ह्यात तो पुणे पोलिसांना सापडला. कारागृहात असतानाच त्याची ओळख अनिकेत पठारे याच्याशी झाली होती. गेल्या फेब्रुवारी २०२५ मध्ये अभय कारागृहातून बाहेर आला.
एक महिना त्याने बुलेट चोरी केली नाही. परंतु त्याला मौजमजेला पैसे मिळेना. म्हणून त्याने पुण्याऐवजी नाशिकमध्ये येत बुलेट दुचाक्या चोरी सुरू केली. गेल्या तीन-चार महिन्यात त्याने सहा बुलेट चोरल्या. यात उपनगर हद्दीतून चार, इंदिरानगर हद्दीतून एक, भद्रकाली हददीतून एक अशा ६ लाख १५ हजारांच्या सहा दुचाक्या जप्त केल्या आहेत.